वरिष्ठ आणि सहकार्‍यांच्याविरूध्द खोडसळपणाने केलेली तक्रार पोलिसांना पडणार ‘महागात’

मुंबई : वृत्तसंस्था – वैयक्तीक हेवेदाव्यातून खोडसाळपणे वरिष्ठ अधिकारी आणि सहकाऱ्यांविरोधात तक्रार करून त्यांना त्रास देणाऱ्या पोलिसांना आता कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. त्रास देण्याच्या हेतूने तक्रार केल्यास संबंधीत पोलिसावर शिस्तभंगाची कारवाई करण्याचे निर्देश पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल यांनी नुकतेच सर्व घटकप्रमुखांना दिले आहेत. त्यामुळे विनाकारण त्रास देण्यासाठी तक्रार अर्ज करणाऱ्यांना आता महागात पडणार आहे.

वैयक्तीक हेवेदाव्यांतून वरीष्ठ किंवा सहकाऱ्यांविरोधात तक्रारी अर्ज करण्याच्या प्रकरणात वाढ झाली आहे. त्यामुळे अशा प्रकरणाचा निपटारा करून संबंधिताविरुद्ध कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. पोलीस दलामध्ये शिस्त आणि अनुशासन याला महत्त्व आहे. पोलीस दलात मिळकतीच्या ठिकाणी नियुक्ती, क्रीम पोस्टींग, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मर्जीतील अधिकाऱ्यांना बढती या कारणांमुळे एकमेकांमध्ये आकस व शत्रुत्व वाढले आहे. त्यामुळे एखाद्याला हाताशी धरुन विरोधक असलेल्या वरिष्ठ आणि सहकाऱ्यांविरुद्ध तक्रारी अर्ज करून पोलीस अधिक्षक, आयुक्तांकडे त्यांच्या चौकशीची मागणी करण्याची प्रकरणे मागील वर्षापासून वाढत चालली आहेत.

त्यातच माहिती अधिकाराचा फायदा घेऊन तक्रार अर्जाचा पाठपुरावा संबंधीतांकडून करण्यात येतो. त्यामुळे यासंबंधीच्या तक्रार अर्जावर वरिष्ठ अधिकारी, प्रशासनाला निर्धारित मुदतीत चौकशी करून कार्यवाही करणे अपरिहार्य आहे. त्याचा परिणाम दैनंदिन कामकाज व शासकीय कामावर होत आला आहे. अनेकदा या अर्जाच्या पडताळणी, चौकशीतून काहीही निष्पन्न होत नाही, अनेक आरोप खोटे असल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच याचा दुसरा असा परिणाम होतो की संबंधीत अधिकारी किंवा कर्मचाऱ्याचे खच्चीकरण होते. त्यांच्यामध्ये नैराश्येची भावना निर्माण होते. त्यामुळेच पोलीस महासंचालकांनी या तक्रार अर्जामागचा करता करवीता कोण आहे याचा शोध घेण्याच्या सुचना घटकप्रमुखांना दिल्या आहेत.

आरोग्यविषयक वृत्त