ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंचे उपोषण सुरू

अहमदनगर: पोलीसनामा ऑनलाईन – लोकपाल व लोकायुक्त यांच्या नियुक्तीच्या मागणीसाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी काही मिनिटापूर्वी उपोषणाला सुरुवात केली आहे. अण्णा त्यांच्या आंदोलनावर ठाम असल्याने जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी त्यांचा राळेगणसिद्धी दौरा रद्द केला आहे.

सध्या ग्रामस्थ, शालेय विद्यार्थी व राज्यासह देशभरातील सामाजिक कार्यकर्त्यांनी राळेगणसिद्धीत गर्दी केली आहे. गावातून रॅली काढून लोकपाल व लोकायुक्त नियुक्तीचा मागणीच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. त्यानंतर अण्णांनी यादवबाबा मंदिरात आरती केली. त्यानंतर मंदिराशेजारी असलेल्या उपोषणस्थळी आले. तेथे ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम’ अशा घोषणा देत अण्णांनी उपोषणाला सुरुवात केली आहे.

अण्णा हजारे यांनी उपोषण करू नये, यासाठी राज्य शासनाचे प्रतिनिधी मधून जलसंपदा मंत्री गिरीश महाजन हे आज सकाळी राळेगणसिद्धीत येणार होते. अण्णांशी चर्चा करून ते आंदोलनापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न करणार होते. मात्र अण्णांनी उपोषणाच्या भूमिकेवर ठाम भूमिका घेतली होती. त्यामुळे महाजन यांनी त्यांचा राळेगणसिद्धी दौरा रद्द केला आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीच्या दिवशीच हजारे यांनी उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे. उपोषणस्थळी गर्दी वाढू लागली आहे.