ज्येष्ठ समाजवादी नेते भाई वैद्य यांची प्रकृती चिंताजनक

पुणे : पोलिसनामा ऑनलाईन
ज्येष्ठ समाजवादी नेते आणि माजी गृहराज्यमंत्री भाई वैद्य यांना स्वादुपिंडाच्या कर्करोगाचे निदान झाले असून सध्या त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. पुना हॉस्पिटलमध्ये अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

वैद्य यांची आठ महिन्यांपूर्वी अँजिओप्लास्टी झाली होती. तीन आठवडय़ांपूर्वी वैद्य यांना स्वादुपिंडाच्या कर्करोगाचे निदान झाले असून त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या विकारामुळे त्यांना श्वासोच्छवास घेण्यास त्रास होत आहे. त्यांच्यावर कार्डिऍक अतिदक्षता विभागात (सीसीयू) उपचार सुरू आहेत. त्यांना कृत्रिम श्वसनयंत्रणेवर ठेवण्यात आले आहे. मात्र, त्यांचे ८९ वर्षांचे वय लक्षात घेता त्यांचा आजार हा औषधांना सध्या पुरेसा प्रतिसाद देत नाही, अशी माहिती त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी दिली.जेष्ठ समाजवादी नेते भाई वैद्य यांच्या प्रकृतीची शरद पवार यांनी पूना हॉस्पिटलमध्ये जाऊन चौकशी केली.