Pune : ज्येष्ठ तबलावादक पंडित विनायकराव थोरात यांचे वयाच्या 85 व्या वर्षी निधन

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –   संगीत क्षेत्रात छोटूकाका या नावाने प्रसिध्द असलेले ज्येष्ठ तबलावादक पंडित विनायकराव थोरात ( वय 85 ) यांचे वृद्धापकाळाने बुधवारी (दि.5) निधन झाले. खाजगी रुग्णालयात उपचारा दरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या मागे त्यांची पत्नी प्रमिला आणि शिष्य परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर हडपसर स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

विनायक थोरात यांचे वडील तबलावादक असल्याने त्यांना लहानपणीच तबल्याची गोडी लागली. सुरुवातीला त्यांनी तबल्याचे शिक्षण वडिलांकडे घेतले. त्यानंतर यशवंतबुवा निकम यांच्याकडे शास्त्रोक्त पध्दतीने शिक्षण घेतले. त्यानंतर तरुणपणात शास्त्रीय संगीतातील दिग्गज गायक मोगुबाई कुर्डीकर, पं.जसराज, पं. भीमसेन जोशी, पं. जितेंद्र अभिषेकी, पं. फिरोज दस्तूर,ज्योत्स्ना भोळे, वसंतराव देशपांडे, राम मराठे आदीना साथ दिली. मात्र 1962 नंतर नाट्यसंगीताला साथ करण्याकडे त्यांचा कल वाढला आणि छोटा गंधर्व जयमालाबाई शिलेदार, कीर्ती शिलेदार यांच्या सोबत तब्बल 45 वर्ष त्यांनी संगत केली. राज्य शासनाचा आण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार, पुणे महापालिकेचा बालगंधर्व पुरस्कार यांसह विविध पुरस्कारांचे ते मानकरी ठरले आहेत.