जिल्हा परिषदेतील बडतर्फ लिपिकाचा कार्य़ालयातच आत्महत्येचा प्रयत्न

नागपूर : पोलीसनामा ऑनलाईन – नागपूर जिल्हा परिषद कर्मचारी प्रशासकीय पतसंस्थेतील कनिष्ठ लिपिकाने बडतर्फ केल्याने आलेल्या नैराश्येतून विषारी औषध पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या घटनेमुळे जिल्हा परिषदेत खळबळ उडाली आहे. अभय ठाकरे (वय-४२) असे या लिपिकाचे नाव असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. ही घटना आज (मंगळवार) दुपारी तीनच्या सुमारास घडली.

अभय ठाकरे कार्यरत असणारी पतसंस्था ही जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांची पतसंस्था आहे. या पतसंस्थेत चार कर्मचारी असून ठाकरे हे त्यापैकी एक आहेत. कायमतत्त्वावर हे कर्मचारी काम करीत असतात. प्रकृती अस्वस्थ्यामुळे ते काही दिवस सुट्यांवर होते, असे सांगितले जात आहे.

प्राप्त माहितीनुसार ठाकरे यांच्या सुट्यांचे प्रमाण वाढत असल्याने संचालक मंडळाने त्यांची सेवा बरखास्त केली होती. यामुळे ते प्रचंड अस्वस्थ होते. ते रोज कार्यालयात येत असत अशी माहिती प्राप्त झाली आहे. अखेर मंगळवारी त्यांनी कार्यालयाच्या परिसरातच विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. सदर परिसरातील एका खासगी इस्पितळात त्यांच्यावर उपचार केले जात आहेत. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जाते.