परमबीर सिंग विरोधातील तक्रारीचे सत्र थांबेना, आता व्यावसायिकाने केला खळबळजनक आरोप

मुंबईः पोलीसनामा ऑनलाइन – माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर दरमहा 100 कोटींच्या खंडणी वसुलीचा आदेश दिल्याचा गंभीर आरोप करणारे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या विरोधातील तक्रारीचे सत्र अद्याप थांबलेले दिसत नाही. आता विरारचे व्यावसायिक मयुरेश राऊत यांनी परमबीर सिंग यांच्यावर खंडणी वसुलीचा खळबळजनक आरोप केला आहे. 2017 साली पोलिसांनी घरावर दरोडा टाकून दोन गाड्या चोरी केल्याचा आरोप राऊत यांनी केला आहे.

मयुरेश राऊत यांनी परमबीर सिंग यांच्यासह माजी पोलीस अधिकारी आणि एन्काऊंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा, पोलीस अधिकारी राजकुमार कोथमिरे आणि इतर पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. माझ्याविरोधात कोणतीही तक्रार नसताना मला खंडणी विरोधी पथकात 3 दिवस डांबून ठेवून मारहाण केल्याचा आरोप केला आहे. तसेच माझी कार मनसुखसारख्या प्रकरणात वापर होण्याची भीतीही त्यांनी व्यक्त केली होती. त्यामुळे आपल्याला न्याय मिळावा, यासाठी त्यांनी डीजीपी आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना पत्र लिहिले. गृहमंत्र्यांनी या प्रकरणाची दखल घेतल्याचे समजते. दरम्यान यापूर्वी क्रिकेट बुकी सोनूने परमबीर सिंगावर आरोप केला होता. तसेच ठाणे शहर पोलीस आयुक्तपदी असताना सिंग यांनी हजारो कोटींचा भ्रष्टाचार केल्याची तक्रार ज्येष्ठ पोलीस निरीक्षक भीमराज घाडगे यांनी पोलीस महासंचालक, तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस महासंचालक यांच्याकडे केली आहे.