धक्कादायक ! अभिनेत्रीच्या माध्यमातून ‘टीम इंडिया’तील 2 खेळाडूंना ‘हनिट्रॅप’च्या जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – भारतीय संघातील काही क्रिकेटपटूंना अभिनेत्रीच्या माध्यमातून हनिट्रॅपध्ये अडकवण्याचा प्रयत्न झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकारामुळे क्रिकेट जगतामध्ये खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बॉलिवूडमधील एका अभिनेत्रीची काही दिवसांपूर्वी दुबईत तीन सट्टेबाजांशी भेट झाली होती. अभिनेत्रीच्या सट्टेबाजांशी झालेल्या भेटीमुळे संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे. मॅचफिक्सिंग आणि स्पॉटफिक्सिंग करण्यासाठी काही भारतीय क्रिकेटपटूंना आपल्या जाळ्यात ओढण्याची जबाबदारी या अभिनेत्रीवर होती. या संदर्भातील वृत्त एका हिंदी वृत्तपत्राने प्रकाशित केले आहे.

त्यामुळे क्रिकेटपटूंनी केले दुर्लक्ष
हिंदी वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, अभिनेत्रीने दोन भारतीय क्रिकेटपटूंशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, या दोन्ही क्रिकेटपटूंनी तिच्याकडे दुर्लक्ष केले. या अभिनेत्रीचे बुकींशी संबंध असल्याची कुणकुण या क्रिकेटपटूंना लागली होती. त्यामुळे त्यांनी तिच्याकडे दुर्लक्ष केल्याचे सांगण्यात येत आहे.

सट्टेबाज मध्य प्रदेश आणि गुजरातचे
अभिनेत्री ज्या सट्टेबाजांच्या संपर्कात होती त्यापैकी एक सट्टेबाज मध्य प्रदेशातील जबलपूरचा आहे. तर उर्वरीत दोन सट्टेबाज गुजरातमधील खंबात येथील आहेत. हे तीनही बुकी मागील काही महिन्यापासून दुबईमध्ये वास्तव्यास असून त्यांनी भारतीय तपास यंत्रणांचे हात आपल्यापर्यंत पोहचू नयेत यासाठी ते दुबईतून आपला कारभार चालवत आहेत.

अभिनेत्रीचे क्रिकेटपटूंसोबत ‘सेल्फी’
हनिट्रॅपमध्ये अडकवण्यासाठी टार्गेट करण्यात आलेल्या दोन भारतीय क्रिकेटपटूंशी जास्तीत जास्त जवळीक साधून भारतीय संघाच्या ड्रेसिंग रुमपर्य़ंत पोहोच वाढवण्याचा सल्ला सट्टेबाजांनी अभिनेत्रीला दिला होता. ड्रेसिंग रुमपर्यंत पोहोच वाढवणे याचाच अर्थ ड्रेसिंग रुममध्ये जे काही होते याची माहिती सट्टेबाजांपर्यंत पोहचवणे. दरम्यान, या अभिनेत्रीने दोन्ही क्रिकेटपटूंची अनेकदा भेट घेऊन त्यांच्यासोबत सेल्फी देखील काढले होते. तसेच तिने बुकीसोबत देखील दुबईत फोटोशुट केले होते.

बुकीवर सॅटेलाईट सिग्नल हॅक करण्याचे आरोप
मध्यप्रदेशातील संशयीत बुकीवर मध्यप्रदेशात झालेल्या एका क्रिकेट सामन्याचे सॅटेलाइट सिग्नल हॅक करण्याचे आरोप आहेत. याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या बुकीने हॅक सिग्नलच्या माध्यमातून आपल्या कोणत्यातरी संकेतस्थळावरून आयपीएलच्या एका सामन्याचे थेट प्रसारण केले होते. या बुकीचे दुबईत दोन क्लब असून त्याठिकाणी भारतातील मोठमोठे बुकी एकत्र येत असतात.

आतापर्य़ंत डझनभर क्रिकेटपटूंवर बंदी
क्रिकेटपटूची भेट एखाद्या बुकीसोबत झाली हा योगायोग असू शकतो. मात्र, तीन तीन सट्टेबाजांसोबत अभिनेत्रीने एकत्र भेट घेतल्याने तिच्याबाबत संशय निर्माण झाला. सट्टेबाजांशी असलेल्या संबंधावरून आतापर्य़ंत डझनभर क्रिकेटपटूंवर बंदी घालण्यात आली आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/