9 वर्षाच्या मुलीच्या खूनप्रकरणातील मुख्य आरोपीची आत्महत्या, परिसरात ‘खळबळ’

मीरारोड : पोलीसनामा ऑनलाइन – घरकामासाठी आणलेल्या नऊ वर्षाच्या मुलीचा खून करून मृतदेह कसारा घाटात फेकून देण्यात आला होता. या गुन्ह्यातील मुख्य आरोपी प्रकाश हरी राठोड (वय-38) याचा मृतदेह उत्तन भागातील एका झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. मृतदेह कुजलेल्या अवस्थेतील असून पोलिसांनी मृतदेहाच्या खिशातील ओळखपत्रावरून ओळख पटवली आहे.

प्रकाश राठोड याने औरंगाबादच्या कन्नड तालुक्यातील चाफेनेर येथून आपल्या मावस भावाची 9 वर्षाची मुलगी भारती चव्हाण हिला तिच्या आईकडून फिरण्यासाठी आणि शिक्षणासाठी सहा महिन्यापूर्वी उत्तन येथे आणले होते. प्रकाश हा उत्तनच्या धावगी मार्गावरील रिध्दी सिद्धी इमारतीत राहतो. दरम्यान, भारतीचा आणि प्रकाशचा संपर्क होत नसल्याने भारतीच्या आईने उत्तन येथे आली. त्यावेळी घराला कुलुप असल्याने तिने पोलिसांकडे धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांनी प्रकाशविरोधात गुन्हा दाखल करुन भारतीचा शोध सुरु केला.

पोलीस भारतीचा शोध घेत असताना प्रकाशची पत्नी अनिता आणि नंतर भाचा आकाश चव्हाण याला ताब्यात घेऊन चौकशी केली. त्यावेळी भारतीच्या खूनाचा उलघडा झाला. प्रकाशने चिमुरड्या भारतीला तिच्या आईची दिशाभूल करून घरकामासाठी आणले होते. तिचा घरकामासाठी छळ करण्यात येत होता. तसेच प्रकाश आणि अनिता तिला मारहाण करत असल्याचे तपासात समोर आले. तसेच 7 नोव्हेंबर रोजी भारतीने अस्वच्छता केली म्हणून प्रकाशने तिचा गळा दाबून खून केला. पुरावा नष्ट करण्यासाठी त्याने प्लास्टिकच्या ड्रममध्ये टाकून त्यात माती आणि सिमेंट टाकून ठेवले. त्यानंतर तिचा मृतदेह ड्रमसह 12 नोव्हेंबर रोजी आकाशने कसारा घाटात टाकून दिल्याचे समोर आले.

पोलिसांनी आकाश आणि अनिताला अटक केली. मात्र, मुख्य आरोपी प्रकाश फरार होता. पोलीस त्याचा शोध घेत असताना बुधवारी सकाळी उत्तनच्या धावरी डोंगर भागात जंगलातून दुर्गंधी येत असल्याचे तेथून जाणाऱ्या पादचाऱ्यांनी पोलिसांना सांगितले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत घटनास्थळाची पाहणी केली. त्यावेळी जंगलातील झाडाला एक व्यक्तीचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. मृतदेहाच्या खिशात आढळलेल्या ओळखपत्रावरून मृतदेहाची ओळख पटवण्यात आली. ओळखपत्रावरून हा मृतदेह प्रकाशचा असल्याचा निष्कर्ष पोलिसांनी काढला आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/