अंडरवर्ल्ड डॉन दाऊदचे साथीदार ड्रग्स विकून करत होते टेरर फंडिंग; धक्कादायक माहिती समोर

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचे साथीदार मुंबईत ड्रग्स विकून टेरर फंडिंग करत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. गँगस्टर चिंकू पठाण याला केंद्रीय अमलीपदार्थ (एनसीबी) पथकाने अटक केलेल्या याची चौकशी केली असता, या चौकशीतून ही खळबळजनक माहिती पुढे आली आहे. मागच्या पाच वर्षांत तब्बल १५०० कोटींचे ड्रग्स विकले गेल्याचे गँगस्टर चिंकू पठाण याच्या चौकशीतून उघड झाले आहे.

केंद्रीय अमलीपदार्थ (एनसीबी) पथकाने गेल्या काही महिन्यांपासून मुंबईत अमली पदार्थ तस्करी करणाऱ्यांच्यावर कारवाईचा बडगा उभारला आहे. याच कारवाई दरम्यान, एनसीबीने गँगस्टर चिंकू पठाणला अटक केली. त्याच्याकडे सापडलेल्या डायरीमधून धक्कादायक माहिती समोर आली आहे. दाऊदचे साथीदार मुंबईत गेल्या अनेक दिवसांपासून ड्रग्स विकून ते पैसे दाऊदला पाठवत होते. हवाला मार्गे हा पैसा मुंबई बाहेर पाठवला जात होता. मागील पाच वर्षांमध्ये या तस्कारांनी १५०० कोट रुपयांचे ड्रग्स विकले होते, हा पैसा दाऊदकडे पोहचल्यावर दाऊद या पैशाचे दहशतवाद्यांना कारवाया करण्यासाठी पुरवत होता, अशी एक धकाकदायक माहिती उघड झाली आहे.