भावनेच्या भरात ‘त्याने’ पाठवले पैसे, बसला 6 लाखांचा ‘फटका’

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – ते दोघे चांगले मित्र, तो अमेरिकेतील अ‍ॅमेझॉन कंपनीत कामाला होता. पण बरेच दिवसात त्याच्याशी संपर्क नव्हता. एके दिवशी त्याचा फेसबुकवर अचानक मेसेज येतो. आई आजारी आहे. तिला हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे. पैसे पाठव. या एका मेसेजवर त्याने भावनेच्या भरात सांगितल्यानुसार गुगल पेद्वारे पैसे पाठविले. पण, त्याचे पैसे पाठविण्याची मागणी थांबत नसल्याचे पाहून त्याने खात्री केली तर आपण मित्राला नाही तर हॅकरच्या जाळ्यात अडकून पैसे पाठवत असल्याचे त्याच्या लक्षात आले.

याप्रकरणी आकाश अशोक जाधव (वय ३१, रा. खराडी) यांनी सायबर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. हा प्रकार ९ ते २४  ऑगस्ट २०१९ दरम्यान घडला. याबाबत पोलिसांनी सांगितले की, आकाश हे खराडीमध्ये पत्नीसह राहतात. ते एका कंपनीत कामाला आहेत. त्यांचा मित्र साहिल पुरी हा अमेरिकेत अमेझॉन कंपनीत नोकरीला असल्याची त्यांना माहिती होती. पण बरेच दिवस त्याच्याशी संपर्क नव्हता. ९ ऑगस्टला त्यांच्या  फेसबुकवर साहिल पुरी यांचा मेसेंजरवर मेसेज आला.

आई आजारी असून तिला हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे. तत्काळ २ लाख रुपयांची आवश्यकता आहे. ती रक्कम गुगल पेद्वारे पाठव असे त्यात म्हटले होते.  आकाश याने आपल्या मित्राचाच मेसेज असल्याचे वाटून खात्री न करता त्याने गुगुल पेद्वारे २ लाख रुपये पाठविले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी पुन्हा त्याच खात्यावरुन आणखी पैशांची मागणी केली गेली. २ लाख, १ लाख, २ लाख अशी पैशाची मागणी साहिल पुरी करीत होता. आकाशनेही त्याला ६ लाख रुपये आतापर्यत पाठविले होते.

तरीही त्याची मागणी सुरुच होती. त्यामुळे आकाश याला संशय आला. त्याने फेसबुकवर साहिल पुरी नावाने प्रोफाईल तपासल्या. त्यावर त्याला दोन साहिल पुरी या नावाने अकाऊंट दिसून आले. त्याने पहिल्या अकाऊंटवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतु, फोन काही लागला नाही. दुसऱ्या अकाऊंटवर व्हिडिओ कॉल केला, तेव्हा ते अकाऊंट त्याचा मित्र साहिल पुरी याचेच होते. त्याने साहिलकडे आईची तब्येत कशी आहे, अशी चौकशी केली. तेव्हा त्याने सांगितले की, आई गावाकडे असते व तिची तब्येत चांगली आहे. हा आकाशला पहिला धक्का होता.

त्यानंतर त्याने चौकशी केली. तेव्हा साहिल पुरी याने सांगितले की, मी अ‍ॅमेझॉन सोडले असून आता अमेरिकेत नाही तर कॅनडामध्ये रहात आहे. आकाश याला हा दुसरा धक्का होता. ज्याचा मेसेज असल्याचे वाटून आपण पेसे पाठविले, तो मेसेज आपल्या मित्राने पाठविलाच नसल्याचे व आपली फसवणूक झाल्याचे आकाश जाधव यांच्या लक्षात आले. त्यांनी सायबर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.
Visit : Policenama.com