Coronavirus : ‘महामारी’चा शेअर बाजाराला ‘दणका’ ! सेन्सेक्सला ‘2700 व्होल्ट्स’चा शॉक, काही मिनीटांमध्ये गुंतवणूकदारांचे 11 लाख कोटी बुडाले

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – जगभरातील परिस्थिती पाहता जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) जीवघेण्या कोरोना व्हायरसला महारोग म्हणून घोषीत केले आहे. यानंतर जगभरातील गुंतवणूकदारांमध्ये एकच खळबळ उडाली. भारतातही कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याने त्याचे पडसाद गुरुवारी भांडवली बाजारात उमटले. ‘कोरोनाच्या भीतीने गुंतवणूकदारांनी बाजार उघडताच जोरदार विक्री केली. यात सेन्सेक्स तब्बल २७०० अंकांनी घसरला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ७८० अंकांनी घसरून ९ हजार ६०० अंकांपर्यंत खाली कोसळला. या दरम्यान दीड तासांत गुंतवणूकदारांना सुमारे ११ लाख कोटींचे नुकसान झाले.

एचडीएफसी बँक, रिलायन्स इंडस्ट्रीज, आयसीआयसीआय बँक, इन्फोसिस आणि एचडीएफसी या मुंबई शेअर बाजाराच्या पाच शेअरने सेन्सेक्सच्या कोसळण्यात ७०० अंकांचा हातभार लावला. १७०० शेअर्सपैकी केवळ १६० शेअर्स तेजीत आहेत. अर्ध्यापेक्षा जास्त शेअर्सनी सर्वाधिक नीचांकी स्तर गाठला असून सेन्सेक्स २६०० अंकांच्या घसरणीसह ३३००० अंकांपर्यंत खाली आला आहे, तर निफ्टी ७२७ अंकांच्या घसरणीसह ९७३१ अंकांवर आहे. या सर्वांत हवाई सेवा देणाऱ्या कंपन्यांच्या शेअरला सर्वाधिक मोठा फटका बसला आहे. स्पाइस जेट १९ टक्क्यांनी घसरला असून इंटरग्लोब एव्हिएशन च्या शेअर्समध्येही मोठी घसरण झाली आहे. हवाई सेवा कंपन्यांप्रमाणे धातू उद्योगावर देखील कोरोनाचा परिणाम झाला आहे. त्यामुळे धातू उद्योगाशी संबंधित शेअर्समध्ये मोठी घसरण झाली.

जिंदाल स्टील आणि वेदांता १० टक्क्यांनी घसरले. तसेच चलन बाजारावरदेखील याचे पडसाद उमटले असून डॉलरच्या तुलनेत रुपया ६४ पैशानी घसरला आहे. सध्या तो ७२.२८ वर ट्रेड करत आहे. दरम्यान, सोमवारी १९०० अंकांनी कोसळलेल्या सेन्सेक्समध्ये बुधवारी तेजी दिसून आली. कोरोना व्हायरस आणि खनिज तेल घसरणीच्या धक्क्यातून सावरलेल्या मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशनाकाने बुधवारी तेजी धरली. गुंतवणूकदारांमध्ये पुन्हा खरेदीचा ओघ वाढवला आणि सेन्सेक्स दुपारी ३४० अंकांनी वधारला होता.

यामुळे झालेल्या नुकसानीत गुंतवणूकदारांची काही प्रमाणात भरपाई झाली होती. शेअर बाजाराच्या या परिस्थितीमुळे गुंतवणूकदारांचे सहा लाख ८४ हजार २७७.६५ कोटी रुपये बुडाले. गेल्या आठवड्यात, शुक्रवारीदेखील गुंतवणूकदारांचे तीन लाख २८ हजार ६८४.५० कोटी रुपये बुडाले. शुक्रवारी सेन्सेक्स ८९३.९९ अंकांनी तर निफ्टी २७९.५५ अंकांनी गडगडला होता. शेअर बाजारात जागतिक स्तरावरील मंदीच्या भीतीने जगभरातील बांडवल बाजारांतही विक्रीचा प्रचंड ओघ सुरू आहे. परिणामी अनेक चांगल्या कंपन्यांचे समभाग गडगडत असून त्यांचे बाजार भांडवलही मोठ्या प्रमाणावर आक्रसत आहे.