Coronavirus : राज्यमंत्री बच्चू कडू यांचे ‘होम क्वारंटाईन’

पोलीसनामा ऑनलाइन – राज्यमंत्री बच्चू कडू यांना काही दिवसांपूर्वी ताप आणि खोकल्याचा त्रास जाणवत होता.  वैद्यकीय तज्ज्ञांच्या सल्ल्याने त्यांनी गेल्या 26 मार्चला कोरोनाची चाचणी करून घेतली. अहवाल नकारात्मक आला असला, तरी त्यांनी पुढील 10 दिवस घरीच विलगीकरणात राहण्याचा निर्णय घेतला आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत एकही रुग्ण कोरोनाचा आढळला नाही. मात्र, बच्चू कडू यांना ताप व खोकला असल्याने त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये चिंता व्यक्त केली जात होती. काही दिवसांमध्ये  ते अचलपूर मतदार संघात प्रशासनातर्फे राबवण्यात येणार्‍या मदत आणि इतर कामांसाठी सातत्याने लोकांच्या संपर्कात येत होते.  ताप आणि खोकल्यामुळे त्यांना कोरोनाची लागण झाल्याचा संशय होता. त्यामुळे त्यांची 26 मार्चला कोरोनाची चाचणी केली होती. त्याचा अहवाल नकारात्मक प्राप्त झाल्याने कार्यकर्त्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. त्यांनी इतरांच्या सुरक्षिततेसाठी स्वत:ला 10 दिवसासाठी घरीच विलगीकरण करून घेतले आहे. कार्यकर्त्यांनी संभ्रमात राहू नये, चिंता करू नये तसेच स्वत:ची काळजी घ्या, घराबाहेर पडू नका, असे आवाहन त्यांनी केले आहे.

काळजी करण्याचे कारण नाही
ताप आणि खोकल्याचा त्रास जाणवल्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्याने  कोरोनाची चाचणी करून घेतली, त्याचा अहवाल नकारात्मक आला आहे, त्यामुळे काळजी करण्याचे कारण नाही. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार  विलगीकरणाचा निर्णय घेतला आहे. कार्यकर्त्यांनी, नागरिकांनी देखील काळजी घ्यावी. घराबाहेर पडण्याचे टाळावे.
– बच्चू कडू, राज्यमंत्री.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
Cinque Terre
You might also like