जास्तीत जास्त लेकरं जन्माला घाला : ‘या’ देशातील सरकारचे जनतेला आवाहन 

वृत्तसंस्था – आपण सर्वजण जाणतो काही देश चक्क लोकसंख्या वाढीच्या प्रश्नामुळे चिंतेत आहेत. यात भारत तसेच चीनचा समावेश आहे. असे असताना दुसरीकडे एक देश असा आहे जिथे सरकारने दाम्पत्यांना मुले जन्माला घालण्याचे आवाहन केल्याची अनोखी बाब समोर आली आहे.

सदर देशातील लोकसंख्या वाढत नसल्याने हा चिंतेत असल्याचे दिसत आहे आणि याच पार्श्वभूमीवर या देशातील सरकारने असे अनोखे आवाहन जनतेला केल्याचे दिसून आले. युरोपमधील हा देश असून सर्बिया असं या देशाचं नाव आहे. दरम्यान या देशात लोकसंख्येची समस्या दूर करण्यासाठी घोषणाबाजीही केली जात असल्याचे चित्र दिसत आहे. परंतु दुसरीकडे  देशातील महिलांनी प्रेरणादायक शब्दांपेक्षा मुले जन्माला घालण्यासाठी चांगल्या सहकाऱ्याची गरज असल्याचे म्हटले आहे.

सर्बिया देशातील जन्मदर प्रचंड वेगाने घटत असताना दिसत आहे. याला कारणही तसेच आहे की, सर्बियातील अनेक लोक देश सोडून जात असताना दिसत आहे. . देशामध्ये सरासरी प्रत्येक दोन कुटुंबामध्ये तीन बालके असल्याचं दिसत आहे. मुख्य बाब अशी की, युरोपमधील ही सर्वात कमी सरासरी असल्याचंही मानलं जात आहे. संयुक्त राष्ट्राच्या एका अंदाजानूसार २०५० पर्यंत सर्बियाची लोकसंख्या १५ टक्क्यांनी कमी होवू शकते असेही समोर आले आहे. कारण सध्या सर्बियाची लोकसंख्या ७० लाखांवर येऊन ठेपली असल्याचं समजत आहे.

दरम्यान लोकसंख्या कमी असल्याने सर्बियाला विविध अडचणींचा सामना करावा लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान लोकसंख्या कमी असण्याच्या या समस्येवर मात करण्यासाठी  सर्बियाकडून विविध भागावर अनेक प्रयत्न केले जात असतानाही दिसत आहे. या अनेक प्रयत्नांपैकीच एक म्हणजे सर्बियातील सरकारकडून जनतेला मुले जन्माला घालण्याचे आवाहन करण्यात आले असल्याचे समजत आहे. दरम्यान लोकसंख्या वाढविण्यासाठी दाम्पत्यांनी जास्तीत जास्त लेकरांना जन्माला घालावे, असेही सर्बियातील सरकारने म्हटले आहे जेणे करून सर्बियातील लोकसंख्या जास्तीत जास्त वाढेल.