सराईतांकडून मोठा शस्त्रसाठा जप्त, ५ पिस्तूले, ९ काडतुसे जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर गुन्हे शाखेच्या युनीट २ च्या पथकाने सराईतांना अटक करून त्यांच्याकडून मोठा शस्त्रसाठा जप्त केला आहे. दोन्ही सराईतांकडून मध्यप्रदेशातून तस्करी करून आलेले ५ पिस्तूल व ९ जिवंत काडतुसे असा तब्बल १ लाख ५१ हजार ८०० रुपये किंमतीचा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे.

मनोज विलास धोत्रे (३४, विश्रांतवाडी, मुळगाव डोणजेगाव, सिंहगड रोड, ता. हवेली, जि. पुणे) व मोहसीन उर्फ मोबा बडेसाब शेख (३६, पर्णकुटी, पायथा, येरवडा) असे अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. मनोज धोत्रे याच्यावर शरीराविरूद्धचे व मालमत्तेविरोधातील ४ गुन्हे शहरात दाखल आहेत. तर मोहसीन शेख याच्यावर खून मारामारी, गंभीर दुखापत, शस्त्र अधिनियमाचे ९ गंभीर गुन्हे दाखल आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोकसभा निव़णूकीच्या पार्श्वभूमीवर शहरात अवैध शस्त्र बाळगणाऱ्या आणि विक्री करणाऱ्या गुन्हेगारांवर पोलिसांचे लक्ष आहे. त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार कारवाई करत असताना रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार मनोज धोत्रे हा पिस्तूल विक्री करण्यासाठी स्वारगेट एसटी स्टॅंडजवळील कॅनल रोडवर येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या युनीट २ चे पोलीस कर्मचारी यशवंत खंदारे यांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून ८ एप्रिल रोजी मनोज धोत्रे याला अटक केली.

त्यानतंर त्याच्याकडून १ पिस्तूल २ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली. तपास केल्यावर त्याला हे पिस्तूल सराईत गुन्हेगार मोहसीन उर्फ मोबा शेख याने दिले असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर त्याला वाघोलीतून अटक करण्यात आली. त्याची झडती घेतल्यावर त्याच्याकडे १ पिस्तूल व २ जिवंत काडतुसे मिळाली. त्यानंतर त्याने पाळलेल्या कबुतरांच्या शेडमध्ये लपवून ठेवलेले ३ गावठी पिस्तूल व ६ जिवंत काडतुसे जप्त केली. त्यानंतर त्यांच्याकडे पोलीस कोठडी सुनावण्यात आली. त्यादरम्यान तपास केल्यावर त्यांनी मध्यप्रदेशातून पिस्तूल आणल्याचे सांगितले. तेव्हा पोलिसांनी मध्यप्रदेशात जाऊन पिस्तूल विक्री करणाऱ्याचा शोध घेतला. परंतु तो मिळून आला नाही. दरम्यान मनोज धोत्रे याने आणखी २ गावठी पिस्तूल व ३ जिवंत काडतुसे विश्रांतवाडी येथे घरात लपवून ठेवले होते.

पोलीस उपायुक्त शिरीष सरदेशपांडे, सहायक पोलीस आयुक्त समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गजानन पवार, सहायक पोलीस निरीक्षक लक्ष्मण डेंगळे, सहायक पोलीस फौजदार यशवंत आंब्रे, पोलीस कर्मचारी अजय खऱाडे, अस्लमखान पठाण, यशवंत खंदारे, मोहसीन शेख, अतुल गायकवड, विशाल भिलारे, उत्तम तारू, अजित फरांदे, मितेश चोरमाले, गोपाल मदने, कादिर शेख यांच्या पथकाने केली.