Mumbai News : मुंबईकरांसाठी मोठा दिलासा ! ‘कोविशिल्ड’ लसींचा पहिला साठा दाखल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – देशात १६ जानेवारीपासून कोरोनाच्या लसीकरणाला सुरुवात होणार आहे. मंगळवारी पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटकडून ‘कोव्हिशिल्ड’ लसींचा काही शहरामध्ये पुरवठा करण्यात आला. दरम्यान मुंबईकरांसाठी या वर्षातील सर्वात मोठी दिलासादायक बातमी आली आहे. लसींचा पहिला साठा १ लाख ३९ हजार ५०० कुप्या बुधवारी पहाटे मुंबईत पोहोचल्या आहेत. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या परळ स्थित एफ/ दक्षिण विभाग कार्यालयात महानगरपालिकेच्या विशेष वाहनाने ही लस पुण्याहून आणण्यात आली. एफ/ दक्षिण विभाग कार्यालयातून मुंबईत ठिकठिकाणी निर्देशित लसीकरण केंद्रांमध्ये ही लस पोहोचवण्यात येईल. त्यामुळे १६ जानेवारी २०२१ रोजी लसीकरणाच्या राष्ट्रीय शुभारंभ प्रसंगी मुंबईतही लसीकरण सुरू करणं शक्य होणार आहे.

मुंबईत कोरोना लसीचा पहिला साठा आणताना पोलिसांची दोन वाहनं सुरक्षिततेचा बंदोबस्त म्हणून सोबत होती. एफ/दक्षिण विभाग कार्यालयात लस साठा वाहने पोहोचताच बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून स्वागत करण्यात आले. त्यानंतर तळमजल्यावरील लस भांडार कक्षात विहित प्रक्रियेनुसार लस साठवण्यात आली आहे.
सुरुवातीला लस साठवून ठेवण्यासाठी मुंबईतील कांजूरमार्ग येथे महापालिकेच्या जागेत कोल्डस्टोरेज उभारण्यात आलं होत. त्याची क्षमता एक कोटी लस साठवून ठेवण्याची होती. मात्र याचं काम पूर्ण होऊ शकलेलं नाही. दुरुस्तीकामे पूर्ण न झाल्याने आरोग्य विभागाने आता लसींचा साठा परळ येथील आरोग्य विभागाच्या मुख्य कार्यालयात करण्याचा निर्णय घेतला. परळ येथील एफ साऊथमधील कार्यालयात १० लाख लसींचा साठा केला जाऊ शकतो. आतापर्यंत एक लाख ३० हजार आरोग्य कर्मचाऱ्यांची नोंदणी को-विन अ‍ॅपवर तिला झालेली आहे.

१६ जानेवारीपासून लसीकरणास सुरुवात होणार असून मुंबईमधील लोकसंख्या लक्षात घेऊन महापालिकेच्या शाळांमध्येही लसीकरण केंद्र सुरू करण्याचा विचार प्रशासन पातळीवर सुरू आहे. तथापि, शाळांमध्ये आवश्यक ती सर्वच वैद्यकीय यंत्रणा उभारावी लागणार आहे. त्यामुळे अखेरच्या टप्प्यात गरज भासली तरच पालिका शाळांध्ये लसीकरण केंद्र सुरू करण्याचा विचार आहे. सुरुवातीला आठ रुग्णालयांमध्ये लसीकरण केंद्रांची उभारणी करण्याची घोषणा प्रशासनाने केली होती. या आठ केंद्रांमध्ये प्रतिदिन १२ हजार जणांना कोरोनाची लस देण्याचे नियोजन होतं. त्यानंतर पालिका रुग्णालयं, सलग्न रुग्णालयं, दवाखाने, जम्बो करोना केंद्र आदी ७५ ठिकाणी लसीकरण केंद्र सुरू करण्याचे प्रशासनाने निश्चित केले. त्या दृष्टीने आखणी सुरू केली असून या केंद्रांमध्ये प्रतिदिन ५० हजार नागरिकांना लस देणे शक्य होणार आहे. मुंबईतील लोकसंख्येने दीड कोटीचा आकडा पार केला आहे. उपलब्ध होणारी लस कमी काळात अधिकाधिक व्यक्तींना देण्याचा मानस आहे. त्यासाठी यंत्रणा सज्ज करण्यात येत आहे.