Corona Vaccine : ‘कोरोना’ची लस हवी असल्यास डॉक्टरांनी विचारलेल्या ‘या’ 7 प्रश्नांची उत्तरे द्यावीच लागणार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – केंद्र सरकारकडून आपत्कालीन वापरासाठी मंजुरी देण्यात आलेल्या कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन लसींच्या वितरणाला सुरुवात झालेली आहे. मंगळवारी सीरम इन्स्टिट्यूटची कोविशिल्ड लस देशातील प्रमुख शहरांमध्ये रवाना झाली. उद्यापासून देशात कोरोना लसीकरणाची मोठी मोहीम राबवली जाणार आहे.

दरम्यान, केंद्र सरकारच्या खास विनंतीवरून आम्ही सर्वसामान्य नागरिकांसाठी सुमारे १० कोटी कोविशिल्ड लसीचे डोस २०० रुपयांमध्ये उपलब्ध करून दिले आहेत. मात्र खासगी वितरणासाठी परवानगी मिळाल्यानंतर हाच डोस १ हजार रुपयांना विकला जाईल, असं या लसीचे उत्पादक आणि सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ आदर पुनावाला यांनी स्पष्ट केलं आहे. तसेच सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने कोरोना लसीसंदर्भात एक फॅक्टशीट जारी केलं आहे. या फॅक्टशीटमध्ये कोरोना लसीचे फायदे, काही साईड इफेक्ट्सबाबत सांगितलं आहे. तुम्हाला जर कोरोनाची लस घ्यायची असेल तर त्याआधी डॉक्टरांनी विचारलेल्या काही प्रश्नांची उत्तरं द्यावी लागणार आहेत.

कोरोनाविरोधातील लसीकरणाबाबत लोकांमध्ये उत्सुकता असली तरी कोरोनाची लस आणि त्याच्या संभाव्य दुष्परिणामांबाबतही चर्चा सुरू झाली आहे. देशातील कोरोना रुग्णांच्या संख्येने एक कोटीचा टप्पा पार केला आहे. तर काहींना आपला जीव गमवावा लागला आहे.

उद्यापासून लसीकरण मोहीम सुरु होणार असून तुम्हाला जर कोरोनाची लस घ्यायची असेल तर त्याआधी डॉक्टरांनी विचारलेल्या काही प्रश्नांची उत्तरं द्यावी लागणार आहेत. हे प्रश्न कोणते ते जाणून घेऊया.

डॉक्टरांनी विचारलेल्या “या” ७ प्रश्नांची उत्तरं द्यावी लागणार
१. तुम्हाला कोणतं औषध, पदार्थ, लसीची किंवा कोविशिल्डमध्ये वापरलेल्या घटकांची अ‍ॅलर्जी आहे का?

२. तुम्हाला ताप आहे का ?

३. तुम्हाला रक्तासंबंधी कोणता आजार किंवा समस्या तर नाही ना? किंवा तुम्ही रक्त पातळ होण्याचं औषधं घेत आहात का ?

४. रोगप्रतिकारक प्रणालीवर प्रभाव टाकत असतील अशी कोणती औषधं तुम्ही घेता का?

५. तुम्ही गरोदर आहात का ?

६. तुम्ही तुमच्या बाळाला स्तनपान करता का ?

७. याआधी तुम्ही कोणती कोरोना लस घेतली आहे का ?

‘सीरम’मध्ये उत्पादीत झालेली कोविशिल्ड लस मंगळवारपासून (दि. 12) पहिल्यांदाच देशभर पाठवण्यास सुरुवात झाली. त्यानंतर पुनावाला माध्यमांशी बोलत होते. येत्या फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिल या तीन महिन्यांत 200 रुपये प्रती डोस याच दराने तब्बल १० कोटी डोस पुरवण्याचे आश्वासन आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिले आहं, असं देखील त्यांनी स्पष्ट केलं आहे. युरोप, अमेरिका, रशिया, चीन आदी जगातील कुठल्याही देशांमध्ये एवढ्या कमी किमतीत ही लस उपलब्ध करून दिली जात नाही, असा दावाही पुनावाला यांनी केला आहे.

पहिल्यांदा स्वदेश, नंतर परदेश…
गेले आठ-नऊ महिने संशोधन, चाचण्या, विविध परवानग्या, उत्पादन अशा वेगवेगळ्या टप्प्यांवर खूप आव्हानात्मक होते. मात्र या सर्व वाटचालीत आमच्या सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांनी योगदान देत आज अखेरीस लस सर्वसामान्य देशवासियांपर्यंत पोहोचवली. आमच्यासाठी हा भावनात्मक क्षण आहे. दर महिन्याला पाच ते सहा कोटी कोविशिल्ड डोस तयार करण्याचे उद्दीष्ट आम्ही ठेवले आहे. पहिल्यांदा देशात पुरेसा पुरवठा झाल्यानंतर इतर देशांना पुरवठा करण्यासंदर्भात विचार केला जाईल. असे सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे
सीईओ आदर पुनावाला यांनी सांगितले