केंद्र सरकारचा मोठा निर्णय ! Serum च्या अदर पुनावालांना Y दर्जाची सुरक्षा

पोलीसनामा ऑनलाइन – देशात कोरोनाने थैमान घातले आहे. दरम्यान कोरोनाच्या या लढाईत लस बाजारात आणणा-या पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ अदर पुनावाला यांना केंद्र सरकारने Y दर्जाची सुरक्षा देण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने बुधवारी (दि. 28) या संदर्भातील अधिसूचना जारी केली आहे. पुनावाला भारतात जिथे कुठेही जातील तिकडे CRPF चे जवान त्यांच्या संरक्षणासाठी हजर असणार आहेत. यात सिक्युरिटी फोर्सेसचे 11 जवान त्यांच्या सुरक्षेसाठी तैनात राहणार आहेत. यापैकी एक किंवा दोन कमांडोदेखील असणार आहेत.

देशात 1 मे पासून 18 वर्षावरील व्यक्तींना कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्याला सुरूवात होणार आहे. सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ही भारतातील सर्वात मोठी कोरोना प्रतिबंधात्मक लसीचा पुरवठा करणारी कंपनी आहे. सध्या देशात लसीकरणामध्ये कोव्हिशिल्ड आणि कोवॅक्सिन या दोन लसींचा वापर होत आहे. पुनावाला यांनी लस बाजारात आणल्यानंतर साहजिकच त्यांच्या जिवाला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.

यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून केंद्राने पूनावाला यांना सुरक्षा व्यवस्था पुरवली आहे. पूनावाला यांना सीआरपीएफद्वारे सुरक्षा पुरवली जाणार आहे. देशभरात सर्वत्र त्यांना सुरक्षा पुरवली जाणार आहे. दरम्यान आजच पूनावाला यांनी कोविशिल्ड या लसीचे दर कमी करणार असल्याची घोषणा केली होती. राज्य सरकारांना आता लसीच्या प्रत्येक डोससाठी 400 रूपयांऐवजी 300 रूपये मोजावे लागणार आहेत.