100 देशांना ‘कोरोना’ लस पाठवणार पुण्याची ‘सीरम इंस्टिट्युट’ !

पोलीसनामा ऑनलाईन टीम : पुण्यातील सीरम इंस्टिट्युट ऑफ इंडिया (Serum Institute of India) आणि युनिसेफ यांच्यात कोव्हीशिल्ड आणि नोवाव्हॅक्सच्या पुरवठ्यासाठी मोठा करार झल्याचं समजत आहे. या करारानुसार, सीरमकडून येत्या काळात जगातील 100 देशांना 110 कोटी कोरोना लशीचे डोस पुरवले जाणार आहेत. या माध्यमातून भारत देश कोरोना लसीच्या निर्मितीतील एक महत्त्वाचा देश म्हणून ओळखला जाणार आहे. अनेक देशांनी कोरोना लस खरेदी करण्यासाठी भारताशी संपर्क देखील साधला आहे.

सीरम इंस्टिट्युट सोबत ऑक्सफर्ड आणि एस्ट्राजेनेकाच्या संयुक्त विद्यमानातून विकसित करण्यात आलेल्या कोव्हीशिल्ड लसीचं उत्पादन करण्याचा करार झाला आहे. तर सीरमचा नोव्हॅक्स या लशीसाठी अमेरिकेतील नोव्हॅक्स इंक कंपनीसोबत करार झाला आहे. युनिसेफचे कार्यकारी अधिकारी हेनरिटा फोर यांनी सीरम सोबत झालेल्या कराराची माहिती जाहीर केली आहे. हेनरिटा फोर यांनी सांगितलं की, पॅन अमेरिका हेल्थ ऑर्गनायजेशन (PAHO) सह इतर अनेक संघटनांशी मिळून एकूण 100 देशांसोबत 110 कोटी लसीच्या डोसची ऑर्डर देण्यात आली आहे. ही लस 3 अमेरिकन डॉलरमध्ये अत्यल्प आणि अल्प उत्पन्न गटातील लोकांना देण्यात येईल असंही त्यांनी सांगितलं.

दरम्यान युनिसेफनं म्हटलं आहे की, जागतिक आरोग्य संघटनेच्या सदस्य देशांमध्ये लस पुरवठा करण्यासाठी आम्ही तत्पर आहोत. अल्प उत्पन्न गटापर्यंत कोरोना लस पोहोचवण्यासाठी याआधीच कोव्हॅक्स मोहिमेची सुरुवात करण्यात आली आहे. संयुक्त राष्ट्र संघ याचं नेतृत्व करत आहे. या मोहिमेअंतर्गत जगातील 145 देशांमधील मजूर आण अल्प उत्पन्न गटातील लोकांना स्वस्त दरात कोरोना लस उपलब्ध करून दिली जाणार आहे. यासाठी कोरोना लस बनवणाऱ्या अनेक कंपन्यांसोबत करार करण्यात आला आहे.