‘कोरोना’ लस चाचणीबाबत नोटीसनंतर सीरमनं दिलं ‘हे’ उत्तर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतात ‘कोव्हीशिल्ड’ नावाने ही लस उत्पादित करणार्‍या पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटने माहिती न दिल्याने औषध महानियंत्रकांनी ‘सीरम’ला नोटीस बजावली आहे . सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाल्यानंतर या लसीची चाचणी का थांबवण्यात आली नाही, अशी विचारणा करण्यात आली होती. नोटीस मिळाल्यानंतर काही वेळात सीरमकडून याबाबत स्पष्टीकरण देण्यात आले. यासंदर्भात चाचणी थांबवण्याचे कोणतेही निर्देश मिळाले नसल्याचे कंपनीने सांगितले आहे.

कोरोना लस चाचणीबाबत आम्ही डीजीसीआयच्या नियमांचे पालन करत आहोत. आम्हाला चाचणी थांबवण्यास सांगण्यात आले नव्हते. जर सुरक्षेबाबत डीजीसीआयला कोणतीही चिंता असेल तर आम्ही त्यांच्या आदेशांचे पालन करू, असे सीरम इन्स्टिट्यूटकडून सांगण्यात आले आहे.ऑक्सफर्ड विद्यापीठाने विकसित केलेल्या या लशीच्या उत्पादनाबाबत सीरम इन्स्टिटयूटची अ‍ॅस्ट्राझेन्काशी भागीदारी आहे. मानवी चाचणीत सहभागी झालेल्या एका व्यक्तीवर लसीचा दुष्परिणाम झाल्याचे आढळल्यानंतर अ‍ॅस्ट्राझेन्काने लशीच्या चाचण्या थांबविण्याचा निर्णय घेतला. या लशीमुळे काय दुष्परिणाम झाले हे स्पष्ट झालेले नाही.

मात्र, लशीची सुरक्षितता पडताळण्यासाठी तूर्त चाचण्या थांबविण्यात आल्याचे कंपनीने स्पष्ट केले. मोठया प्रमाणात चाचण्या करण्यात येत असताना एखाद्या व्यक्तीवर दुष्परिणाम झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र, त्याची स्वतंत्र समितीद्वारे तपासणी करून सुरक्षेबाबतची खातरजमा करून घेण्यासाठी चाचण्या थांबविण्यात आल्या आहेत. चाचण्यांमध्ये सहभागी झालेल्यांची सुरक्षा आणि लशीच्या उच्च दर्जाबाबत कटिबद्ध असल्याचे अ‍ॅस्ट्राझेन्काच्या प्रवक्त्यांनी सांगितले.