Coronavirus Vaccine : दिलासादायक ! ‘कोरोना’विरूध्दच्या लसीसाठी पुण्यातील ‘सीरम’ इन्स्टिटयूटची तयारी पुर्ण

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – जगभरात धुमाकुळ घालत असलेल्या कोरोना विषाणूने लाखो लोकांचा बळी घेतला आहे. कोरोना व्हायरसचा निपटारा करण्यासाठी जगभरातील अनेक संशोधकांनी कंबर कसली आहे. कोरोनावरील लस संशोधनात वेगवेगळ्या ठिकाणी प्रयोग सुरु आहेत. यातील ऑक्सफोर्ड विद्यापिठाची लस सगळ्यांसाठी आशेचा किरण ठरत आहे. विद्यापीठाशी करार असल्यामुळे पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटमध्ये ऑक्सफर्डच्या लसीची निर्मिती होणार आहे.

ऑक्सफर्डने संशोधन केलेल्या लसीची निर्मिती करण्याची सीरमची तयारी पूर्ण झाल्याची माहिती मिळत आहे. सीरम जवळपास कोरोना लसीचे एक अब्ज डोस तयार करण्याच्या तयारीत असल्याचं एका वृत्तसंस्थेने म्हटले आहे.

50 टक्के डोस भारतीयांसाठी
कोरोनावर लवकरात लवकर मिळावी, त्यातही ती भारतीयांना आणि गरीब देशांना लवकर मिळावी, यासाठी सीरम इन्स्टिट्यूट प्रयत्नशील असल्याचे कंपनीचे सीईओ आदर पुनावाला यांनी यापूर्वीच स्पष्ट केलं आहे. त्यातही तयार होणाऱ्या लसीचे 50 टक्के डोस हे भारतीयांसाठी असतील, असेही त्यांनी जाहीर केले आहे. कंपनीला काही दिवसांपूर्वीच साठ कोटी काचेच्या डब्या उपलब्ध झाल्या आहेत. कमी वेळात जास्तीत जास्त लस तयार करण्याची क्षमता असल्याने इन्स्टिट्यूटकडे मोठ्या आशेने पाहिले जात आहे.

भारतात होणार ह्युमन ट्रायल
सीरम इन्स्टिट्यूट आणि ऑक्सफर्ड विद्यापीठाने तयार केलेल्या कोरोना लसीच्या भारतातील चाचण्या बाकी आहेत. या चाचण्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या होणे अपेक्षीत आहे. लस दिल्यानंतर भारतीयांना कोणते साईड इफेक्ट्स होतात का ? हे पाहणे गरजेचे आहे. केंद्रीय औषध नियंत्रण संस्था आणि ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (डीसीजीआय) यांनी सीमरमला चाचणीसाठी परवानगी देण्याची शिफारस केली आहे. त्यामुळे ऑगस्ट महिन्यात भारतात चाचण्या सुरु होण्याची शक्यता असल्याचे पुनावाला यांनी सांगितले.

5 वेगवेगळ्या पातळीवर लस निर्मिती
सीरम इन्स्टिट्यूटचे सीईओ आदर पुनावाला यांनी अमेरिकेतील एका वृत्तवाहीनीला व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे मुलाखत दिली. यामध्ये पुनावाला यांनी सांगितले की, कोरोनावरील लसीचा विचार केला तर कोणतीही एक संस्था याची निर्मिती करू शकणार नाही. त्यासाठी एकमेकांच्या मदतीची आवश्यकता आहे. सध्या पाच वेगवेगळ्या पातळ्यांवर आम्ही कोरोनाची लस निर्मिती करत आहोत. त्यातील एक तरी प्रयोग निश्चित यशस्वी होईल, अशी आशा आहे. या पाचमध्ये आमच्या संस्थेच्या दोन सलींचाही प्रयोग आहे.

या दोन लसींची प्राण्यावरील चाचणी आणि इतर मानवी चाचण्यांचे टप्पे लक्षात घेता, इथून पुढे दीड वर्षानंतर आमची लस उपलब्ध होईल अशी अपेक्षा आहे. त्यामुळेच आम्ही इतर संशोधन संस्थांशी करार करून, पुढे जाण्याचा प्रयत्न करत आहोत. ऑक्सफर्डच्या लसीबाबत संशोधकांना विश्वास आहे. भारतातील चाचण्या यशस्वी ठरल्या तर, आपण ऑक्सफर्ड आणि आपल्या करारनुसार जगभरातील सत्तर देशांमध्ये ही लस वितरीत करु शकतो.