‘सीरम’च्या अदर पूनावालांचे वडीलही लंडनमध्ये; देश सोडल्याच्या चर्चेवर सायरस पुनावाला म्हणाले – ‘खोटं आणि दुर्देवी’

पोलीसनामा ऑनलाइन टीम – सीरम इन्स्टिट्यूट भारतात कोविशिल्ड या कोरोनावरील लसीचं उत्पादन करत आहे. मात्र सध्या या लसीचा तुटवडा जाणवत असून सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पूनावाला यांनी एका रात्रीत लसीचं उत्पादन वाढवणं, त्यात तेजी आणणं शक्य नसल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर अदर पूनावाला यांनी थेट लंडन गाठले. त्यानंतर सर्वत्र त्यांनी देश सोडल्याची चर्चा सुरु झाली. हि घटना ताजी असतानाच सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे अध्यक्ष आणि अदर पूनावाला याचे वडील सायरस पूनावाला हेदेखील लंडनला गेल्याची माहिती समोर आली. त्यामुळे अनेक उलटसुलट चर्चा सुरु झाल्या आहेत. त्यावरून आता सायरस पूनावाला यांनी द संडे एक्स्प्रेसला दिलेल्या मुलाखतीत देश सोडल्याची चर्चा किंवा आरोप मुलावर किंवा माझ्यावर करणं खोटं आणि दुर्देवी असल्याचंही त्यांनी म्हंटले आहे.

सायरस पूनावाला म्हणाले, मला जसे समजू लागले तेव्हापासून उन्हाळी सुट्टी म्हणजे मे महिना हा भारताच्या बाहेरच घालवला आहे. यावेळीही हि कोणती नवी गोष्ट नाही. लंडनमधील मुक्काम हा तात्पुरता आहे. जेव्हा अदर पूनावाला लहान होते तेव्हापासून त्यांना घेऊन आपण लंडनला येत होतो. आता त्यांची मुलं लंडनमध्ये शिक्षण घेत आहेत. हा एक नियमित प्रवास आहे. खरं पाहिलं तर आम्ही दरवर्षी डर्बीत जातो, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

गेल्या महिन्याभरापासून अदर पूनावाला हे लंडनमध्ये आहेत. त्यांनी एका मुलाखतीत कोविशिल्ड लसीच्या पुरवठ्यासाठी दबाव टाकण्यात येत असून काही शक्तिशाली लोकांकडून धमकी मिळाल्याचंही त्यांनी म्हटलं होतं. दि ३ मेला अदर पुनावाला यांनी एका रात्रीत लसीचं उत्पादन वाढवणं शक्य नसल्याचे सांगितले. कंपनी क्षमता वाढवण्यासाठी शक्य ते प्रयत्न करत आहे. अधिकाधिक मेहनत घेऊन ध्येय गाठण्यात येईल असे ते म्हणाले होते.

दरम्यान, युरोपमध्ये नव्या योजनांवर कंपनी विचार करत आहे. कोरोनाच्या लसींचं उत्पादन भारतात सुरू आहे. युरोपमध्ये आम्ही काही कंपन्यांसोबत चर्चा करत आहोत. याबद्दल आत्ताच काही सांगणं घाईचं ठरणार असल्याचंही पूनावाला म्हणाले.