सर्व्हिसिंगला आली ‘गाडी’ अन उघडकीस आला कामगाराचा ‘प्रताप’

सातारा : पोलीसनामा ऑनलाइन – सातारा शहरातील हे एक दुचाकी वाहनांच्या विक्रीचे शोरुम आहे. दुचाकी गाडी विकल्यानंतर पुढच्या दोन तीन सर्व्हिसिंग त्या विक्रेत्यांकडून फ्रीमध्ये करुन दिल्या जातात. त्याप्रमाणे शुक्रवारी आपली नवी कोरी दुचाकी घेऊन या शोरुमच्या सर्व्हिसिंग सेंटरमध्ये घेऊन आला. तेथील कामगारांनी त्याच्याकडील कागदपत्रे पाहिल्यावर त्याचा गोंधळ उडाला.

गाडी तर त्यांच्याच शोरुमची होती पण कागदपत्रे व गाडीचा चॅसिज नंबर हे काही जुळत नसल्याचे त्याला कॉम्प्युटरवर दिसत होते. त्याने ही बाब आपल्या वरिष्ठांना सांगितली. त्यातून एका कामगाराचा प्रताप समोर आला. या कामगाराने गेल्या काही महिन्यात कागदपत्रात फेरफार करुन तब्बल ४४ गाड्या विकल्या होत्या. याची शोरुममधील कोणालाच पत्ता लागला नाही. सर्व्हिसिंगला आलेल्या गाडीवरुन हा फसवणुकीचा प्रकार समोर आला आहे.

सातारा शहर पोलीस ठाण्यात शशिकांत चांगदेव नलवडे (रा़ धनगरवाडी, पो़ कोडोली, सातारा) या कामगारावर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पोलिसांनी सांगितले की, बॉम्बे रेस्टॉरंट चौकात कणसे होंडा शोरुम आहे. या शोरुममध्ये काही महिन्यांपूर्वी शशिकांत नलवडे हा काम करत होता. शोरुममध्ये गाड्या खरेदी करण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना भेटून तो नागरिकांना भेटून तो परस्पर कागदपत्रांमध्ये फेरफार करत होता.

त्यानंतर गोदामातील गाड्या तो नागरिकांना विकत होता. त्याच्याकडून गाडी घेतलेला एक तरुण शुक्रवारी गाडी सर्व्हिसिंग करण्यासाठी शोरुमला आला. या तरुणाकडे असलेली कागदपत्रे आणि चॅसिज नंबर जुळत नव्हते. त्यामुळे शोरुममधील कर्मचाऱ्यानी तुम्ही गाडी कोणाकडून खरेदी केली असे विचारले. तेव्हा त्याने नलवडे याचे नाव सांगितले. त्यानंतर शोरुमधील व्यवस्थापकाने गोदामातील गाड्या मोजल्या. तेव्हा त्यात ४४ गाड्या नसल्याचे व त्या परस्पर विकल्या गेल्याचे उघड झाले. याप्रकरणी व्यवस्थापक संग्राम माने यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

 

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/