नोंदणी व मुद्रांक विभागाचा सर्वर सकाळपासून डाऊन

पुणे : पोलिसनामा ऑनलाईन – नोंदणी व मुद्रांक विभागाच्या दस्त नोंदणी विभागाचा सर्वर आज सकाळपासून डाऊन झालेला आहे. त्यामुळे नोंदणी विभागाच्या दुय्यम निबंधक कार्यालयातील सर्व व्यवहार सकाळपासून खोळंबले आहेत. त्यामुळे आज व्यवहार कऱणाऱ्यांना प्रचंड मनस्तापास सामोरं जावं लागत आहे.

नागरिकांना सदनिका, दुकाने, जमीन आदींच्या खरेदी-विक्रीची नोंदणी करण्यासाठी दुय्यम निबंधक कार्यालयात जावे लागते. आता दस्त नोंदणी ऑनलाईन सुरु आहे. पुण्यातील कार्यालयात आज सकाळपासूनच गर्दी होती. मात्र सकाळी सकाळी सर्वर डाऊन झाल्याने नोंदणीचे काम ठप्प झाले आहे. त्यामुळे सदनिका खरेदी विक्री, जमीन, दुकाने यांची खरेदी विक्रीच्या दस्तांची नोंदणी होऊ  शकली नाही. त्यामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागला आहे. त्यासोबतच आज जर सर्वर सुरु झाला नाही तर उद्या चौथा शनिवारची सुट्टी आणि लगेचच रविवारची सुट्टी यामुळे आज व्यवहार करण्यास इच्छुक असलेल्यांना दस्त नोंदणीसाठी सोमवारीच कार्यालयात यावे लागणार आहे. मागील काही महिन्यांपासून दस्त नोंदणीच्या प्रणालीमधील तांत्रिक समस्या वाढल्या आहेत. त्यामुळे या विभागाकडे शासनाचे दुर्लक्ष होत असल्याबद्दल नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

नोंदणी व मुद्रांक विभाग राज्याला महसूल देणारा दुसऱ्या क्रमांकाचा विभाग आहे. दरवर्षी सुमारे २१ हजार कोटींचा महसूल राज्य शासनाच्या तिजोरीत जमा होतो. राज्यात सुमारे ५०६ दुय्यम निबंधक कार्यालये असून या कार्यालयांमध्ये सदनिका, दुकाने,जमीन आदींचे खरेदी-विक्रीचे व्यवहार तसेच  भाडेकरार, बक्षीसपत्र, मृत्यूपत्र आदी प्रकारचे दस्त नोंदविले जातात. या कार्यालयांमध्ये हे दस्त नोंदविण्यासाठी नागरिकांची नेहमी गर्दी असते.