सेवा, कर्तव्य, त्याग सप्ताहात कोरोना योद्ध्यांचा गौरव व आरोग्यविषयक उपक्रम संपन्न

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना काळात सेवा दिलेल्या कोरोना योद्ध्यांचा गौरव, आरोग्यविषयक जनजागृती, रक्तदान शिबीरे आणि समाजातील अनाथ, गरजूंना मदत अशा विविध उपक्रमांनी यंदाचा सेवा, कर्तव्य, त्याग सप्ताह कोरोना योद्ध्यांना समर्पित करण्यात आला. कॉंग्रेस पक्षाच्या अध्यक्षा आदरणीय श्रीमती सोनियाजी गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा, कर्तव्य, त्याग सप्ताहाचे आयोजन दरवर्षी केले जाते.

यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्यविषयक उपक्रमांनी सप्ताह साजरा करण्यात आला.
यंदा सप्ताहाचे १६ वे वर्ष होते. मुख्य संयोजक माजी आमदार मोहन जोशी, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रमेश बागवे, शेखर कपोते, प्रशांत सुरसे, अनिल अहिर, चेतन अगरवाल, साबीर शेख, उन्नद फाऊंडेशनचे जावेद खान, विक्रम बोराडे, नरेश धोत्रे, अ‍ॅड. शाबिर खान, किशोर मारणे यांनी उपक्रमांच्या आयोजनात सहभाग घेतला.

मूल निवासी मंच व उन्नद फाऊंडेशन या मुस्लीम समाजाच्या कार्यकर्त्यांनी कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींवर विधीवत अंत्यसंस्कार केले. हिंदू मृतदेहांचे हिंदू रिवाजाप्रमाणे तर मुस्लिम मृतदेहांचे मुस्लिम रिवाजाप्रमाणे अंत्यविधी केले आणि समाजात एकात्मतेचा एक नवा आदर्श निर्माण केला. अशाच कोरोना योद्धयांना यंदाचा सेवा,कर्तव्य, त्याग सप्ताह समर्पित करुन त्यांचा सन्मान करण्यात आला.

वृद्धाश्रमात फळे व धान्याचे वाटप, रक्तदान शिबिर आणि आरोग्य शिबिराचे आयोजन, महिलांना कॅन्सर संदर्भात मार्गदर्शन, मोफत तपासणी आणि औषधांचे वाटप करण्यात आले. येरवडा येथील ज्या जंगम दांम्पत्याने कोरोनाग्रस्त रुग्णांचा अंत्यविधी केला त्यांचा त्यांच्या घरी जाऊन सन्मान करण्यात आला. विश्रांतवाडी येथील महानगरपालिकेच्या सफाई कर्मचाºयांचा देखील सत्कार करण्यात आला. भवानी पेठेतील सोनावणे हॉस्पिटल मधील आशा वर्कर्स यांना कोरोना योद्धा सर्टिफिकेट देऊन सन्मान करण्यात आला.

मोहन जोशी म्हणाले, मागील १५ वर्षे सलग देशभरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी सप्ताहातील कार्यक्रमांना हजेरी लावली आहे. मात्र, यावर्षी हा सप्ताह मोठया प्रमाणात न करता सामाजिक भान राखून करण्यात आला आहे. कोरोना योद्धे म्हणून समाजातील अनेकांनी अहोरात्र काम केले आहे. त्यांच्या कार्याला सलाम करण्यासोबतच यापुढील काळात आरोग्याविषयी काय काळजी घ्यावी, याबाबत मार्गदर्शनपर उपक्रम करण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.