भाजपविरोधात व्हिडीओ तयार केला म्हणून अटक करणे गैर, न्यायालयाने पोलिसांना फटकारले

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार आणि भाजपविरोधात व्हिडीओ करून युट्यूबवर अपलोड करणाऱ्या तरुणाला अटक केल्याप्रकरणी सत्र न्यायालयाने पोलिसांना फटकारले आहे. पोलिसांनी ही कारवाई हेतुपुरस्सर केली असल्याचे म्हणत पोलिसांनी कायद्याचे संकेत डावलून कारवाई केली आहे. त्यामुळे अटक केलेल्या राकेश कनोजिया या तरुणाला तात्काळ सोडून देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

राकेश कनोजिया हा शिकवणी वर्ग चालवतो. त्याने ११ एप्रिल रोजी त्याने युट्यूबवर हा व्हिडीओ अपलोड केला होता. त्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून भाजप आणि मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांच्यावर टीका केली होती. त्यासोबतच या नेत्याच्या तोंडाला काळे फासायला हवे असंही तो म्हणाला होता. त्यानंतर शहिदांच्या नावे मत मागितल्याप्रकरणी पत्रकंही निवडणूक आयोगाने जप्त केली आहेत असं तो व्हिडीओत म्हणतो. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी सांताक्रुझ पोलिसांनी त्याला अटक केली. त्याला न्यायालयात हजर केल्यानंतर त्याला २६ एप्रिल पर्यत ताब्यात ठेवण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर त्याचा व्हिडीओ दंगल घडविण्यास प्रवृत्त करू शकतो. म्हणून ही कारवाई केल्याचं पोलिसांनी न्यायालयात सांगितलं होतं.

राकेशने गुन्हा केला आहे असं पोलिसांना वाटत असेल तर त्याच्याविरोधात योग्य त्या कलमांखाली गुन्हा दाखल करायला हवा होता. कायद्याची प्रक्रिया न पाळता पोलीस अशा प्रकारे कुणावरही कारवाई करू शकत नाहीत. पोलिसांनी हेतुपुरस्सर ही कारवाई केल्याचे निष्पन्न होते. निवडणूक सुरु आहे. म्हणून नागरिकाचे व्यक्तिगत स्वातंत्र्य हिरावून घेता येत नाही. त्यामुळे राकेशला ताब्यात ठेवता येणार नाही. त्याला सोडून देण्याचे आदेश सत्र न्यायाधिश एन. एल. मोरे यांनी म्हटले आहे.