‘डिजिटल’ पेमेंट सेवेसाठी तयार केली जाईल ‘हेल्पलाइन’, 24 तास करेल काम

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) पुन्हा एकदा चलनविषयक धोरण समितीच्या (MPC) बैठकीत व्याज दरात बदल न करण्याचा निर्णय घेतला आहे. ही लागोपाठ चौथी वेळ आहे जेव्हा आरबीआयने पॉलिसी व्याज दर (Policy Rates) कायम राखले आहेत. सध्या रेपो दर (Repo Rate) 4% आणि रिव्हर्स रेपो दर (Reverse Repo Rate) 3.35% आहे.

डिजिटल पेमेंट सेवा बळकट करण्यासाठी आरबीआयचा मोठा निर्णय
दरम्यान, डिजिटल पेमेंट सेवांना अधिक बळकट करण्यासाठी आरबीआयने डिजिटल पेमेंट सेवांसाठी 24×7 काम करणारी एक हेल्पलाईन तयार करण्याची घोषणा केली आहे. केंद्रीय बँकेने म्हटले आहे की डिजिटल पेमेंट सर्व्हिसमध्ये लोकांना होणाऱ्या कोणत्याही प्रकारच्या अडचणीवर मात करण्यासाठी सर्व पेमेंट सिस्टम ऑपरेटर्सना 24×7 हेल्पलाईन सुरू करावी लागेल. ही सेवा सप्टेंबरपर्यंत सुरू होईल.

या दरम्यान रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास म्हणाले की, “डिजिटल पेमेंट्समध्ये वाढ होत चालली आहे. त्यांची कार्यक्षमताही वाढली आहे. हे लक्षात घेता, प्रमुख पेमेंट सिस्टम ऑपरेटर्सना केंद्रीकृत 24×7 हेल्पलाईन तयार करण्याची आवश्यकता आहे. या मदतीने ग्राहकांच्या डिजिटल पेमेंट उत्पादनांशी संबंधित प्रश्नांची उत्तरे दिली जातील.”

दास पुढे म्हणाले, “याद्वारे ग्राहकांना डिजिटल पेमेंट संबंधित तक्रारींचे निवारण करण्यासाठी उपलब्ध असलेल्या यंत्रणेची माहितीही दिली जाईल. नंतर पुढे जाऊन या सुविधेच्या माध्यमातून ग्राहकांच्या तक्रारी दूर करण्यासाठी देखील विचार केला जाईल. या हेल्पलाइनमुळे ग्राहकांचा डिजिटल पेमेंट इकोसिस्टमवरील विश्वास वाढेल.”