अकोला : सुनील धोपेकर हत्याकांड प्रकरणातील 7 आरोपींना जन्मठेप !

अकोला : पोलीसनामा ऑनलाईन – जुने शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पातूर रोडवरील जयराज वाईन बार मध्ये 7-8 जणांनी मद्यप्राशन करून जेवण केल्यानंतर बिलाचे 4 हजार रुपये न देता बारचे व्यवस्थापक सुनील धोपेकर यांच्याशी वाद घालून त्यांची हत्या करणाऱ्या 7 आरोपींना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं मंगळवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. या हत्याकांड प्रकरणी 8 जणांविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. यापैकी 7 आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली असून एकाची निर्दोष सुटका झाली आहे. सत्र न्यायालयानं या हत्याकांड प्रकरणी आठही आरोपींची निर्दोष मुक्तता केली होती.

नेमकं प्रकरण काय ?
प्रकाश इंगळे (33), सतीश गुलाब खंडारे (34), सागर रामराव उपरवाट (29), नितेश गुलाब खंडारे (30), कुणाल शिवचरण तायडे (32), अध्यक्ष मोहन घुगे (37) व शुभम शेषराव खंडारे (32) या आरोपींनी 13 ऑगस्ट 2014 रोजी यथेच्छ मद्यप्राशन करून जेवणही केलं. त्यानंतर बिलाचे पैसे देण्यावरून त्यांचा वाद झाला. आरोपींनी रिपाइंचा महानगराध्यक्ष गजानन काशिनाथ कांबळे (46) याला तिथं बोलवलं. त्यामुळं वाद अजूनच वाढला. तरीही वेटरनं 4 हजारांचं बिल देऊन या आरोपींना पैशांची मागणी केली. परंतु आरोपींना वेटर आणि कर्मचाऱ्यांसोबत वाद घालायला सुरुवात केली. यावेळी वाईन बारचे व्यवस्थापक सुनील धोपेकर यांनी वाद मिटवण्याचा प्रयत्न करून बिलाची मागणी केली. परंतु नशेत असणाऱ्या आरोपींनी सुनील धोपेकर यांच्यावर लोखंडी पाईप आणि काठीनं हल्ला केला. यात सुनील धोपेकर यांचा मृत्यू झाला.

यानंतर या प्रकरणी जुने शहर पोलिसांनी आरोपींविरुद्ध भादंवि मधील कलम 302, 326 आणि इतर कलमांअंतर्गत गुन्हा दाखल केला. न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केल्यानंतर जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही डी केदार यांच्या न्यायालयानं आरोपींची सबळ पुराव्यांअभावी निर्दोष सुटका केली. सरकार पक्षानं मात्र या निर्णयाविरोधात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात धाव घेतली. नागपूर खंडपीठाचे न्यायमुर्ती झेड ए हक आणि अमित बोरकर यांच्या खंडपीठानं गजानन काशिनाथ कांबळे वगळता इतर 7 आरोपींना सुनील धोपेकर यांच्या हत्याकांड प्रकरणात दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

2018 मध्ये निर्दोष सुटले होते आरोपी
5 मार्च 2018 रोजी सुनील धोपेकर हत्याकांडातील आरोपींची ठोस पुरावे नसल्यानं सत्र न्यायालयानं निर्दोष सुटका केली होती. राज्य सरकारनं या निर्यणाविरोधात उच्च न्यायालयात अपील केलं होतं. विविध कायदेशीर बाबी लक्षात घेता उच्च न्यायालयानं हा सुधारीत निर्णय दिला. राज्य सरकारच्या वतीनं अ‍ॅड. तहसीन मिर्झा यांनी कामकाज पाहिलं.

कुटुंबीयांना 5 लाखांची मदत
उच्च न्यायालयाच्या खंडपीठानं आरोपींना एकूण 5 लाख रुपये दंड ठोठावला आहे. दंडाची ही रक्कम मयताच्या कुटुंबीयांना भरपाईम म्हणून अदा करण्याचे निर्देश नागपूर खंडपीठानं दिले. सुनील धोपेकर यांच्या कुटुंबीयांना आता 5 लाखांची मदत होणार आहे.