अरे देवा ! पोटातील 10 कोटींचं ड्रग्ज काढण्यासाठी 10 ‘डझन’ केळी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अंमली पदार्थाची तस्करी करणारे आपण पकडले जाऊ नये म्हणून वेगवेगळी शक्कल लढवताना दिसतात. अफगाणिस्तानहून दिल्ली येथे अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या एका टोळीने चक्क तब्बल १७७ हेरॉइनच्या कॅप्सूल खाल्ल्या होत्या. या सात जणांच्या पोटातून या कॅप्सूल जप्त करण्यात आल्या आहेत. आणखी अचंबित करणारी गोष्ट म्हणजे या कॅप्सूल पोटातून बाहेर काढण्यासाठी तब्बल १० डझन केळी आरोपींना खायला दिली होती. अंमली पदार्थ नियंत्रण विभागाच्या अधिकाऱ्यांनी एका गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई केली.

विमानतळावर अधिकाऱ्यांनी या आरोपींची झडती घेतली. त्यांच्याजवळ काहीच न आढळल्यामुळे त्यांची स्कॅनिंग आणि एक्स-रे काढण्यास पाठवले. याचे अहवाल आल्यानंतर या सातही जणांच्या पोटात अंमली पदार्थाच्या कॅप्सूल आढळून आल्या. त्याशिवाय, अन्य दोन जणांनाही अटक करण्यात आली असून हे दोघे भारतात राहणारे आहेत. हे दोघेजण रिसीव्हर असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. डॉक्टरांनी आरोपी रहमतुल्लाहच्या पोटातून २८ कॅप्सूल, फैजकडून ३८, हबीबुल्लाह आणि वदूद यांच्याकडून १५, अब्दुल हमीदकडून १८, फजल अहमदकडून ३७ आणि नूरजई कबीरकडून २६ कॅप्सूल जप्त केल्या.

आपण पकडले जाऊ नये म्हणून या कॅप्सूल मध आणि एका विशिष्ट प्रकारच्या तेलाच्या मदतीने पोटात ढकलण्यात आल्या होत्या. विशेष म्हणजे अफगाणिस्तान ते दिल्ली येईपर्यंत या सातही प्रवाशांनी काहीच खाल्ले नव्हते. दिल्लीला पोहाचल्यानंतरच या कॅप्सूल पोटातून बाहेर काढण्याचे त्यांचे नियोजन होते. पण अंमली पदार्थ नियंत्रण विभागाच्या सतर्कतेमुळे त्यांचे नियोजन फसले.

फेसबुक पेज लाईक करा https://www.facebook.com/policenama/