निवडणूकीपुर्वी बेळगावात सात कोटींच्या बनावट नोटा जप्त
बेळगाव : पोलीसनामा ऑनलाईन
निवडणुकीपुर्वी बेळगाव पोलिसांनी मध्यरात्री एक वाजता धाड टाकून सात कोटी रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या असून, आगामी कालावधीत होणाऱ्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात बनावट नोटांचा साठा सापडल्यामुळे बेळगावात एकच खळबळ उडाली आहे. बनावट नोटा प्रकरणी अजितकुमार निडोनी याला पोलिसांनी अटक केली असून तो मूळचा विजापूरचा आहे.
शहराच्या विश्वेश्वरय्यानगर परिसरातील एका घरामधून नोटांचा साठा जप्त केला. पोलिसांनी धाड टाकलेले घर हे सरकारी कर्मचाऱ्याचे निवासस्थान असून, 500 आणि हजाराच्या सात कोटी रुपयांच्या बनावट नोटा आहेत. पाचशे रुपयांच्या 25,300 नोटा तर दोन हजारांच्या 29,300 नोटा असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. तसेच निवडणुकीमध्ये ग्रामीण भागात वाटण्यासाठी या बनावट नोटा आणण्यात आल्याची माहिती पोलिस तपासात समोर आली आहे.