सहा आरोपींकडून सव्वा चार लाखांचा ऐवज जप्त

निगडी : पोलीसनामा ऑनलाईन – निगडी पोलिसांनी मागील आठ दिवसांमध्ये केलेल्या चार वेगवेगळ्या कारवायांमध्ये पिस्तूल, वाहन चोरी आणि मोबाईल चोरी करणाऱ्या सहा आरोपींना अटक केली आहे. आरोपींकडून १६ मोबाईल, ४ दुचाकी व २ पिस्टल असा एकूण ४ लाख २२ हजार ६०० रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

त्रिवेणीनगर परिसरात गस्त घालत असताना पोलीस नाईक सतीश ढोले आणि पोलीस कॉन्स्टेबल राहुल मिसाळ यांना माहिती मिळाली की, भक्ती शक्ती चौकजवळ एका बॅन्डच्या गाडी जवळील कमानी लगत असलेल्या रोडवर दोन तरुण दुचाकीवर संशयितरित्या थांबले आहेत. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून सनी गौतम घाडगे (वय २०, रा. जिजामाता चौक, हरिओम कॉलनी, वाल्हेकरवाडी, चिंचवड. मूळ रा. पातळशेत, ता. रोहा, जि. रायगड) आणि सोमनाथ उर्फ सोम्या साहेबराव भगत (वय १९, रा. पत्राशेड, अजंठानगर, निगडी) या दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून १६ मोबाईल आणि दोन मोटारसायकल जप्त केले. आरोपींकडून निगडी पोलीस ठाण्यात दाखल असलेले तीन गुन्हे उघडकीस आले असून २ लाख ४७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

आकुर्डी मधील आंध्रा बँकेच्या समोरील रोडवरून एकल ताब्यात घेऊन एक पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे तर जुना जकात नाका निगडी येथून एकाला ताब्यात घेऊन त्याच्याकडून देखील एक पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली. सुधाकर उर्फ पिंटू तुकाराम सूर्यवंशी (वय 30, रा. बौध्दनगर, ओटास्कीम, निगडी), सिद्धेश्वर धर्मदेव शर्मा (वय 22, रा. विकासनगर, तरसवस्ती, देहूरोड) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

निगडी मधील अंकुश चौकाजवळ दोन मुलांकडून मेस्ट्रो दुचाकी (एम एच 14 / जी आर 9126) जप्त केली. याप्रकरणी संतोष अनिल गायकवाड (वय 27, रा. ओटास्कीम, निगडी), गणेश सखाराम कोंडेकर (वय 21, रा. माले भांबुर्डे रामवाडी, ता. मुळशी) यांना अटक केली आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त आर के पद्मनाभन, अप्पर पोलीस आयुक्त मकरंद रानडे, पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त रामचंद्र जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमरनाथ वाघमोडे, पोलीस निरीक्षक राजेंद्र निकाळजे, सहाय्यक पोलीस निरीक्षक लक्ष्मण सोनवणे, पोलीस कर्मचारी किशोर पढेर, स्वामीनाथ जाधव, संदीप पाटील, रमेश मावसकर, सतीश ढोले, विलास केकाण, राहुल मिसाळ, विजय बोडके, मितेश यादव, गणेश शिंदे, सोमनाथ दिवटे यांच्या पथकाने केली.