महाराष्ट्राच्या ‘या’ ७ नेत्यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ ; सुरेश प्रभू व सुभाष भामरे यांना वगळले

नवी दिल्ली : वृत्त संस्था – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत काही नेत्यांना देखील मंत्रीपदाची शपथ देण्यात आली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील सात नेत्यांचा समावेश आहे. या नेत्यांमध्ये रामदास आठवले, नितीन गडकरी, संजय धोत्रे, रावसाहेब दानवे, पियुष गोयल, प्रकाश जावडेकर, अरविंद सावंत यांचा समावेश आहे. नितीन गडकरी, प्रकाश जावडेकर, पियुष गोयल, अरविंद सावंत यांचा कॅबिनेटमध्ये समावेश केला आहे तर रामदास आठवले, संजय धोत्रे, रावसाहेब दानवे यांना राज्यमंत्री म्हणून समावेश केला आहे.

नितीन गडकरी

नितीन गडकरी यांनी चौथ्या क्रमांकावर येऊन मंत्रिपदाची शपथ घेतली. गेल्या सरकारमध्ये नितीन गडकरी यांनी रस्ते आणि वाहतूक मंत्रालयाची धुरा सक्षमपणे सांभाळली होती त्यामुळे यावेळेस देखील त्यांना याच खात्यांची जबाबदारी देण्यात येईल.

प्रकाश जावडेकर

प्रकाश जावडेकर यांना देखील मंत्रिपदाची शपथ देण्यात आली आहे. जावडेकर यांनी मावळत्या सरकारमध्ये मनुष्यबळ मंत्रालयाची धुरा सांभाळली होती. त्यांच्याकडे यावेळेस देखील महत्वाची जबाबदारी देण्यात येईल. जावडेकर यांचा अपेक्षेप्रमाणे कॅबिनेट मध्ये समावेश केला आहे.

अरविंद सावंत

भाजपचा मित्र पक्ष असलेल्या शिवसेनेच्या अरविंद सावंत यांना मंत्रिपदाची शपथ देण्यात आली आहे. त्यांना मंत्रिपद देण्यात येईल हे जवळपास निश्चित झाले होते.
अरविंद सावंत यांना कॅबिनेट मंत्रिपद देण्यात आले आहे.

पियुष गोयल

पियुष गोयल हे मोदी सरकारमध्ये अर्थमंत्री होते. त्यांनी अरुण जेटली यांच्या अनुपस्थितीत अर्थसंकल्प सादर केला होता. पियुष गोयल यांना वाणिज्य किंवा अर्थ मंत्रालयाची धुरा मिळण्याची शक्यता आहे. यांचा अपेक्षेप्रमाणे कॅबिनेट मध्ये समावेश केला आहे.

रावसाहेब दानवे

महाराष्ट्राचे भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना पुन्हा एकदा मंत्री पद देण्यात आले आहे. गेल्या सरकारमध्ये रावसाहेब दानवे यांना मंत्रीपद देण्यात आले होते. पण राज्यातील परिस्थिती सांभाळण्यासाठी त्यांना महाराष्ट्रातील भाजप प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली होती. या सरकारमध्ये रावसाहेब दानवे यांना मंत्रिपद मिळाल्यामुळे महाराष्ट्राच्या भाजप प्रदेशाध्यक्ष पदाची धुरा कोणत्या नेत्यावर सोपवली जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

संजय धोत्रे

संजय धोत्रे यांच्या रूपाने महाराष्ट्राला एक नवीन मंत्रिपद मिळाले आहे. संजय धोत्रे अकोला लोकसभा मतदारसंघाकडून सलग चार वेळेस निवडून आले आहेत.
संजय धोत्रे यांचा राज्यमंत्री म्हणून सरकरमध्ये समावेश केला आहे.

रामदास आठवले

रिपब्लिकन पक्षाचे नेते रामदास आठवले यांना देखील मंत्री पदाची शपथ देण्यात आली आहे. गेल्यावेळेस त्यांच्याकडे सामाजिक न्याय राज्यमंत्र्याची जबाबदारी देण्यात आली होती. रामदास आठवले यांचा राज्यमंत्री म्हणून या सरकारमध्ये समावेश केला आहे.

संजय धोत्रे आणि अरविंद सावंत यांनी प्रथमच केंद्रीय मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. मावळत्या सरकारमध्ये मंत्री असलेले सुरेश प्रभू आणि सुभाष भामरे यांना मात्र मंत्री पदाची शपथ देण्यात आलेली नाही. मंत्रिमंडळाचा विस्तार होईल त्यावेळी राहिलेल्या नावांचा समावेश केला जाण्याची शक्यता आहे.