छत्तीसगडमध्ये ७ नक्षलवाद्यांचा खात्मा ; मोठा शस्त्रसाठा हस्तगत

जगदलपूर : वृत्तसंस्था – छत्तीसगडमधील जगदलपूर जिल्ह्यात शनिवारी सायंकाळी पोलीस आणि नक्षलवादी यांच्या भीषण चकमकीत ७ नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात पोलिसांना यश मिळाले आहे. घटनास्थळावरुन मोठा शस्त्रांचा साठा पोलिसांच्या हाती लागला आहे. या घटनास्थळी इन्सास रायफल, ३०३ रायफल, १२ बोअरची भरमार बंदुक, बॅनर, पोस्टर, औषधी स्फोटके, डिटोनेटर, वीजेच्या तारा, बॅटरी आणि दैनंदिन वापराच्या साम्रुग्री मोठ्या प्रमाणावर  मिळाल्या आहेत.

याबाबत बस्तरचे पोलीस महानिरीक्षक विवेकानंद सिन्हा यांनी सांगितले की, नक्षली शहीद सप्ताहाची तयारी करीत असून त्यासाठी ओडिशा सीमेवरील तिरिया गावाच्या जंगलात गोळा झाले असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार नगरनार पोलीस ठाण्यातून एसटीएफ, डीआरजी आणि डीएफ यांचे पथक शोध मोहिमेवर निघाले. जंगलात एके ठिकाणी त्यांना नक्षलवाद्यांची चाहुल लागली. पोलिसांना पाहून नक्षलवाद्यांनी गोळीबार सुरु केला. पोलिसांनी त्याला प्रतिउत्तर देण्यास सुुरुवात केली. सुमारे तासभर ही चकमक सुरु होती. त्यानंतर नक्षलवादी जंगल आणि पहाडाचा आश्रयाने पळून गेले.

त्यानंतर पोलिसांनी पुढे जाऊन पाहणी केल्यावर त्यांना सात मृतदेह सापडले. तसेच रक्ताचे डाग व ओढून नेल्याच्या खुणा आढळून आल्या. त्यामुळे या सात जणांबरोबर आणखी काही जण गंभीर जखमी झाले असावेत, असा पोलिसांना संशय आहे. जखमी अथवा मृतदेह  नक्षलवादी स्वत:बरोबर घेऊन गेले असावेत.