सोन्याच्या दुकानावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या चोरट्यांना अटक

पुणे : पोलीनामा ऑनलाईन – शहरातील पुणे स्टेशनजवळच्या पुलावर एका तरुणाला लुबाडणाऱ्या ७ सराईतांना सोन्याच्या दुकानावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असताना येरवडा पोलिसांनी अटक केली केली. त्यांच्याकडून ५ लाख १५ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

सुरज ज्ञानेश्वर जाधव (वय २२, रा. जयप्रकाश नगर येरवडा), मनोज बबन गायकवाड (वय ३५, रा,.येरवडा), आकाश भगवान मिरे (वय २१, रा कामराज नगर येरवडा), विजय काशीनाथ कांबळे (वय ३१, रा. येरवडा), सागर दीपक अडागळे (वय २०, रा. येरवडा), रुपेश दिलीप अडागळे (वय २०, रा. येरवडा), अभिजीत अनिल मिसाळ (वय २०, रा. येरवडा)अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

पुणे रेल्वे स्टेशनजवळील पुलावर एका तरुणाला लुबाडणाऱ्या आरोपींचा शोध घेण्यासाठी येरवडा पोलीस ठाण्याचे तपास पथक गस्त घालत होते. त्यावेळी पथकातील कर्मचारी अशोक गवळी आणि शरद बांगर यांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, येरवडा परिसरात काही तडीपार करण्यात आलेले सराईत गुंड फिरत असून ते साथीदारांसह एका सोन्याच्या दुकानावर दरोडा टाकणार आहेत.

त्यानुसार पोलिसांनी लागलीच बंगला नं ५ येथे जाऊन छापा टाकून सात जणांना ताब्यात घेतले. तेव्हा त्यांच्याकडे चोकशी केल्यावर त्यांनी पुणे रेल्वे स्टेशनजवळ एकाला लुबाडल्याचे कबूल केले. त्यांच्याकडून पोलिसांनी हत्यारे जप्त केली.तर त्यांच्याकडून एकूण ७ दुचाकी, १ सोन्याची चैन, १ सॅक, २ लोखंडी सुरे, लोखंडी रॉड, मिरची पूड, आणि सुती दोरी असा ५ लाख १५ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

ही कारवाई अप्पर पोलीस आयुक्त सुनील फुलारी, पोलीस उपायुक्त प्रसाद अक्कानवरू, सहायक पोलीस आयुक्त शिवाजी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली येरवडा पोलिसांच्या पथकाने केली.