Coronavirus : देहूत एकाच कुटुंबातील 7 जण ‘कोरोना’ पॉझिटिव्ह

देहू/पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  पुणे आणि पिंपरी-चिंचवडसह आजूबाजूच्या शहरांमध्ये कोरोना विषाणूचा फैलाव वेगाने वाढू लागला आहे. पिंपरी-चिंचवड शहरालगत असलेल्या देहूमध्ये एकाच कुटुंबातील सात जणांचा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने एकच खळबळ उडाली आहे. या सात जणांचा अहवाल आज (मंगळवारी) प्राप्त झाल्याची माहिती देहूचे प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. किशोर यादव यांनी दिली. पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये दोन ज्येष्ठ नागरिकांचा आणि दोन युवकांचा समावेश आहे.

देहूमध्ये मागील तीन महिन्यांपासून एकही कोरोनाचा रुग्ण आढळून आला नाही. मात्र, 13 जून रोजी एका 75 वर्षीय नागरिकाला कोरोना असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर त्यांच्या कुटुंबातील इतर सहा जणांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्याचा अहवाल आज प्राप्त झाला असून यामध्ये सहाजण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले. या सर्वांना तळेगाव दाभाडे येथील जनरल रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. आज प्राप्त झालेल्या अहवालामध्ये दोन ज्येष्ठ नागरिक, 17 आणि 27 वर्षाचे दोन तरुण तर 40 आणि 45 वर्षाचे दोन जण असल्याचे डॉ. यादव यांनी सांगितले. हे एकाच कुटुंबातील असून एक जण जावई आहे. हे सर्वजण एकमेकांच्या घरासमोर राहतात.

खबरदारीचा उपाय म्हणून देहू येथील चव्हाण नगर भाग प्रशासनाने सील केला आहे. तसेच सार्वजनिक ठिकाणी दोहूच्या नागरिकांनी विना मास्क फिरू नये किंवा गर्दी करू नये असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. दरम्यान, माळाडी गावातील तीन जणांचा अहवाल निगेटिव्ह आला होता. माळवाडी येथील एका कुटुंबात भिमाशंकर येथील एक व्यक्ती तिन दिवस राहण्यास होती, आणि या व्यक्तीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता.