मारहाण करुन घरफोडी करणाऱ्याला सात वर्षांची शिक्षा

सांगली : पोलीसनामा ऑनलाईन – खानापूर तालुक्यातील गार्डी येथे मायणी रस्त्यावरील एका घरात घरफोडी करताना दांपत्याला मारहाण करुन गंभीर जखमी करण्यात आले होते. दांपत्याला मारहाण करुन घरातील ऐवज चोरुन नेण्यात आला होता. डिसक्या उर्फ बॉक्सर लाल्या भोसले (वय-३० रा. साठेफाटा, ता. फलटण जि. सातारा) याला पोलिसांनी अटक केली होती. या प्रकरणात न्यायालयाने त्याला आज सात वर्षाची शिक्षा सुनावली. जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. एन. पाटील यांनी हा निकाल दिला. सरकार पक्षातर्फे अ‍ॅड. बाळासाहेब देशपांडे यांनी काम पाहिले.

बाळासाहेब श्रीपती साळुंखे पत्नी छाया, मुले पृथ्वीराज, ओंकार गार्डी येथे मायणी रस्त्यावरील घरात रहातात. साळुंखे यांचा रिक्षा व्यवसाय आहे. दि. 5 जुलै 2013 रोजी साळुंखे कुटुंबिय घरात झोपलेले असताना तीन अनोळखी व्यक्तींनी त्यांच्या घरात प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी बाळासाहेब साळुंखे व छाया साळुंखे यांना डोक्यात जड हत्याराने मारून जखमी केले. त्यानंतर त्यांच्या घरातील तिजोरी फोडून त्यातील तीन बॅगा, एलसीडी टीव्ही, मोबाईल असा ऐवज लंपास केला होता.

चोरी आणि मारहाणीची ही घटना बाळासाहेब यांचा मुलगा पृथ्वीराज याने पाहिली होती. त्यानंतर त्यानेच याबाबत विटा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानंतर पोलिसांनी डिसक्या भोसले याला अटक केली होती. न्या. ए. एन. पाटील यांच्यासमोर या खटल्याची सुनावणी झाली. यावेळी पृथ्वीराज साळुंखे, बाळासाहेब साळुंखे व डॉक्टरांच्या साक्षी महत्वाच्या ठरल्या. या साक्षी आणि पुराव्यांच्या आधारे भोसले याला घरफोडीप्रकरणी सात वर्षे व दुखापत केल्याप्रकरणी सात वर्षे अशी शिक्षा सुनावण्यात आली. या दोन्ही शिक्षा त्याने एकत्र भोगायच्या आहेत.