क्रूरतेचा कळस ! पोलिसांनी वडिलांच्या मांडीवर बसलेल्या चिमुकलीवर झाडली गोळी, जागीच मृत्यू

म्यानमार : वृत्तसंस्था – म्यानमारमध्ये सत्तापालटानंतर रोज लोक रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत. दरम्यान, पोलिसांनी आंदोलकांवर केलेल्या गोळीबारात एका सात वर्षीय निष्पाप चिमुकलीचा जीव घेतला आहे. पोलिसांनी वडिलांच्या मांडीवर बसलेल्या एका चिमुकलीच्या डोक्यात गोळी झाडून तिला ठार केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांच्या गोळीबारात अनेकांचा मृत्यू झाला आहे.

खिन मायो चित असे गोळीबारात मृत्यू झालेल्या चिमुकलीचे नाव आहे. मृत खिन मायो ही प्रदर्शनकर्त्यांवर केलेल्या कारवाईत आतापर्यंत जीव गमावलेली सर्वात कमी वयाची पीडिता ठरली आहे. CNN च्या रिपोर्टनुसार, मृत मुलीच्या शेजारी असलेल्या सुमायाने सांगितले, की पोलिस मांडले शहरात मंगळवारी प्रदर्शनकर्त्यांचा शोध घेण्यासाठी आले होते. यावेळी पोलिसांनी लाथ मारून खिनच्या घराचा दरवाजा तोडून आत घुसले.

पोलिसांनी या मुलीच्या वडिलांना विचारले, की कोणी प्रदर्शनासाठी बाहेर गेले होते का ? त्यावेळी मुलीच्या वडिलांनी नाही, असे सांगितले. त्यामुळे पोलिसांनी मुलीच्या वडिलांना खोटे बोलल्यामुळे मारहाण केली. हे पाहून खिन मायो चित आपल्या वडिलांच्या कुशीत बसली. मात्र, तरीही पोलिसांनी गोळीबार सुरुच ठेवला. यात एक गोळी या मुलीला लागली आणि तिचा जागीच मृत्यू झाला. म्यानमारच्या सेनेने एक फेब्रुवारीला सत्तापालट केली होती. तेव्हापासून रोज प्रदर्शन केले जात आहे. मोठ्या संख्येने लोक रस्त्यावर उतरुन अटक केलेल्या नेत्यांच्या सुटकेची मागणी करत आहेत. नोव्हेंबरमधील निवडणूक फसवणूक झाली होती, असा लष्कराचा दावा आहे. त्याच आधारे एका वर्षासाठी आणीबाणी लागू केली आहे.