Coronavirus : धक्कादायक ! एका चोरामुळे 17 पोलीसांसह न्यायाधीशांवर ‘क्वारंटाइन’ होण्याची ‘वेळ’

पोलिसनामा ऑनलाईन – देशात कोरोनाचा व्हायरस वेगाने पसरत असून सोशल डिसटन्स न पाळल्यामुळे संसर्ग वाढत आहे. पंजाबमध्ये अटक करण्यात आलेल्या चोराला करोनाची लागण झाली होती. त्यामुळे 17 पोलीस कर्मचार्‍यांना क्वारंटाइन करण्यात आले आहे. लुधियानामध्ये या सर्वांना क्वारंटाइन करण्यात आले आहे. फक्त पोलीस कर्मचारी नाही तर न्यायाधीश आणि न्यायालयातील कर्मचारी यांनाही स्वविलगीकरणात राहण्याचा आदेश देण्यात आला आहे.

वाहनांची चोरी करणार्‍या सौरव सेहगलला पोलिसांनी  अटक करुन 5 एप्रिल रोजी न्यायालयात हजर केल होते. त्याआधी त्याला जीवन नगर पोलीस ठाण्यात त्याला एका दिवसासाठी बंदिस्तही ठेवले होते. पोलिसांनी दोन स्थानिकांच्या मदतीने चोराला अटक केली होती. पण त्याला करोना झाल्याचे निष्पन्न होताच त्याच्या कुटुंबातील 11 जणांनाही क्वारंटाइन करण्यात आले आहे. 6 एप्रिल रोजी न्यायाधीशांना सौरव सेहगलला ताप आणि खोकला असल्याचे दिसून आले. त्यानंतर  पोलिसांना त्याची वैद्यकीय तपासणी करण्याचा आदेश दिला.

सौरव सेहगल आणि त्याच्या साथीदाराला न्यायालयीन कोठडीत पाठवण्याआधी वैद्यकीय तपासणी करुन घेतली. यावेळी सौरवला करोना असल्याचे चाचणीत स्पष्ट झाले. यानंतर न्यायाधीश आणि न्यायालयातील कर्मचार्‍यांना स्वविलगीकरणात जाण्यास सांगण्यात आलं आहे. दरम्यान रुग्णालयात नेत असताना सौरवचा साथीदार नवज्योत सिंह याने पळ काढला. सोनसाखळी चोरी प्रकरणांमध्ये त्याचा सहभाग होता.  सौरव आजारी वाटत होता, पण नवज्योतची प्रकृती चांगली होती. पण सौरवच्या संपर्कात आल्याने त्यालाही कोरोनाची लागण झाल्याची भीती असून पोलीस शोध घेत आहेत.