येरवडा कारागृहातून आल्यानंतर 4 पोलिसांसह 13 जण क्वारंटाईन !

कऱ्हाड :  पोलीसनामा ऑनलाइन – चौकशीसाठी येरवडा कारागृहातील संशयित आरोपीला कऱ्हाड पोलिसांच्या गुन्हे शाखेतील पोलिसांनी ताब्यात घेऊन कऱ्हाडला आणले होते. चौकशी झाल्यानंतर त्याला पुन्हा येरवडा कारागृहात सोडण्यात आले. मात्र, संशयित आरोपीची कोरोना चाचणी रिपोर्ट पॉझिटिव्ह आढळून आल्याने संबंधित चार पोलीस कर्मचारी, गार्ड अशा 13 जणांना क्वारंटाइन करण्यात आले आहे. त्यांच्या घशातील स्त्रवाचे नमुने तपासणीसाठी देण्यात आले आहेत. मात्र, आता संबंधित कर्मचाऱ्यांच्या संपर्कात आलेल्यांचे धाबे दणाणले आहेत.

येरवडा कारागृहातून गुन्ह्यातील एका संशयिताला शहर पोलीस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण शाखेतील पोलीस कर्मचाऱ्यांनी ताब्यात घेऊन त्याला शहरात आणले होते. त्याच्याकडे चौकशी करून त्याला पुन्हा येरवडा कारागृहात नेऊन सोडण्यात आले. त्यानंतर येरवडा कारागृहात त्याची कोरोना टेस्ट करण्यात आली असता कोरोना टेस्टचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. त्यामुळे त्याच्या संपर्कात आलेल्या पोलिसांवर क्वारंटाईन करण्याची कार्यवाही करण्यात आली. या सर्व कर्मचाऱ्यांना कृषी महाविद्यालयाच्या विलगीकरण कक्षात विशेष पथकाच्या देखरेखीखाली उपचार सुरु आहेत.
दरम्यान, शहर पोलीस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण शाखेचे चार कर्मचारी, गार्ड व अन्य अशा 13 जाणांच्या घशातील स्त्रावाचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. त्या सर्वांची आरोग्याची काळजी घेण्यात येत आहे. त्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह येतील असा विश्वास पोलीस उपअधीक्षक सुरज गुरव यांनी व्यक्त केला आहे.