नंदूरबारमध्ये विचित्र अपघातात १७ वर्षीय युवती ठार

नंदूरबार : पोलीसनामा ऑनलाईन – भरधाव वेगातील चारचाकीने रिक्षा, स्कूटी आणि दुचाकी यांना धडक दिल्याने झालेल्या विचित्र अपघातात एका १७ वर्षीय मुलीला आपला जीव गमवावा लागला. नंदूरबारमध्ये कल्याणेश्वर मंदिराजवळ बुधवारी रात्री नऊच्या सुमारास हा अपघात घडला. या घटनेत इतर ५ जण जखमी झाले आहेत.

प्रतिभा मच्छले (वय १७) असे ठार झालेल्या मुलीचे नाव आहे. याप्रकऱणी अज्ञात वाहनचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बुधवारी रात्री नऊच्या सुमारास कल्याणेश्वर मंदिराजवळ भरधाव वेगातील एका स्कॉर्पिओ गाडीने समोरून येणारा आपे रिक्षा (क्रमांक एमएच ३९ जे ४९२३), स्कूटी (क्रमांक एमएच ३९, ५८७०), अ‍ॅक्टीव्हा, (क्रमांक एमएच ३९ क्यू २७९१), शाईन दुचाकी (क्रमांक एमएच ३९ एई ३०५९) यांना जोरदार धडक दिली. यात प्रतिभा स्कूटीवर होती. गंभीर जखमी झाल्याने तिला तात्काळ स्थानिकांनी जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तिला उपचारापुर्वीच मृत घोषित केले. तर इतर चार जखमींनाही जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघात झाल्यावर स्कॉर्पिओचालक मात्र तेथून पसार झाला.

Loading...
You might also like