सरकारी नोकरदारांना झटका ! 7 व्या वेतन आयोगाबाबत ठाकरे सरकारनं काढला ‘हा’ नवीन आदेश

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – सध्या देशात कोरोना महामारीचा कहर आहे. या महामारीमुळे देशाला आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. अशा परिस्थितीत आता राज्य सरकारने राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा सातव्या वेतन आयोगाचा दुसरा हप्ता एक वर्ष पुढे ढकलला आहे. राज्य सरकारच्या अर्थ विभागाकडून याबाबत आदेश काढण्यात आला आहे.

देशासह राज्यात कोरोनाचा प्रभाव वाढत आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन लागू करण्यात आले होते. पण लॉकडाऊन दरम्यान सर्व उद्योग धंदे बंद होते. त्यामुळे राज्याच्या महसुलावर मोठा परिणाम झाला आहे.

म्हणूनच राज्य सरकारने सातव्या वेतन आयोगाचा दुसरा हप्ता पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला असून त्याचे देय १ जुलै रोजी होते. अर्थ विभागाने याबद्दल आदेश काढला असून राज्य कर्मचारी आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना एक वर्ष हप्ता मिळणार नाही.

सातव्या वेतन आयोगाची थकबाकी ५ समान हप्त्यांमध्ये देण्याचे ठरले असून याबद्दल आधीच्या सरकारने ५ वर्षात निधी देण्याचा निर्णय घेतला होता. यातील पहिला हप्ता हा मागील वर्षी कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीत जमा करण्यात आला असून दुसरा हप्ता वर्षभरासाठी पुढे ढकलण्यात आला आहे.