महाराष्ट्रातील 13 अकृषिक विद्यापीठातील 4 हजार 903 शिक्षकेतर पात्र कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाचा लाभ भेटणार

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्रातील १३ अकृषिक विद्यापीठातील ४ हजार ९०३ शिक्षकेतर पात्र कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाचा लाभ भेटणार आहे. यासाठी १ जानेवारी २०१६ पासून वेतननिश्चिती करण्याचे आदेश उच्च शिक्षण विभागाने काढले आहे. १५ जानेवारीपर्यंत माहिती सादर करावी, १ नोव्हेंबर २०२० पासूनच हा लाभ भेटेल, असेही उच्च शिक्षण विभागाने नमूद केले.

यशवंतराव मुक्त विद्यापीठातील कर्मचारी या लाभापासून वंचित राहतील. सातवा वेतन आयोग लागू केल्यावर राज्याच्या तिजोरीवर दरमहा साडेचार कोटींपर्यंत अतिरिक्त बोजा पडणार आहे. तथापि, इतर विभागातील कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाचा पूर्णपणे फरक रोखीने टप्प्या टप्प्यात देण्याचा निर्णय झाला आहे. त्याप्रमाणे विद्यापीठातील एकाही शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना वेतनाचा फरक मिळणार नसल्याचे उच्च व तंत्रशिक्षण विभागाने स्पष्ट केले.

मात्र, १ जानेवारी २०१६ पासून वेतननिश्चिती करताना या पात्र कर्मचाऱ्यांना काल्पनिक वेतनवाढ दिल्याचे ग्राह्य धरण्यात येईल. तत्पूर्वी, काही विद्यापीठातील ४८३ कर्मचाऱ्यांनी पदनाम बदलून वेतनवाढ घेतली आहे. त्या कर्मचाऱ्यांना पाचव्या-सहाव्या वेतन आयोगाचा लाभ मिळाल्याचे कागदपत्रे उपलब्ध नसल्यास त्यांना सातव्या वेतन आयोगानुसार वेतनवाढ मिळणार नाही.

दरम्यान, याबाबत उच्च शिक्षण विभागाचे संचालक डॉ. धनराज माने म्हणाले, राज्य सरकारच्या निर्णयानुसार अकृषिक विद्यापीठातील कर्मचाऱ्यांना १ नोव्हेंबर २०२० पासून सातवा वेतन आयोगाचा लाभ भेटणार आहे. त्यासाठी १५ जानेवारी पर्यंत सर्व विद्यापीठांना पात्र कर्मचाऱ्यांची वेतननिश्चिती करुन माहिती पाठवण्याचे निर्देश दिले आहेत.