Aurangabad News : 71 जणांकडून बँक ऑफ महाराष्ट्रची 1 कोटी 9 लाखांची फसवणूक

बिडकीन : पोलीसनामा ऑनलाइन – (जि.औरंगाबाद) बनावट कागदपत्रे सादर करून तब्बल 1 कोटी 9 लाख 71 हजार रुपयाची बॅंकेची फसवणूक केल्याचा प्रकार नुकताच बॅक ऑफ महाराष्ट्रच्या बिडकीन (ता. पैठण) शाखेत उघडकीस आला आहे. या प्रकरणी शेतकऱ्यांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा बिडकीन पोलीस ठाण्यात गुरुवारी (दि. 7) दाखल केला आहे.

बॅंक ऑफ महाराष्ट्रच्या बिडकीन शाखेतर्फे दरवर्षी शेतकऱ्यांना पीककर्ज हे वाटप केले जाते. यंदाही कोरोना काळात देखील शेतकऱ्यांना बँकेने पीककर्ज वाटप केले होेते. मात्र नव्याने सहा महिन्यांपूर्वी बिडकीन येथील शाखा व्यवस्थापक यांनी पीककर्ज वाटप केलेल्या शेतकऱ्यांची फेर तपासणी केली असता 71 शेतकऱ्यांच्या कागदपत्रांमध्ये त्रुटी आढळून आल्या. संबधित शेतकऱ्यांना वारंवार नोटीस पाठवून देखील त्यांनी मूळ दस्तावेज बिडकीन शाखेत दाखल न केल्याने फसवणूक झाल्याचे बँकेच्या लक्षात आले. या प्रकरणी बिडकीन शाखेचे शाखाव्यवस्थापक अवय कुमार दुबे शेतकऱ्यांच्या विरोधात फसवणुकीची तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

शेतकऱ्यांनी महाराष्ट्र बँकेची 1 कोटी 9 लाख 71 हजार रुपयांची फसवणूक केली आहे. बहुतांश शेतकरी मुलानी वाडगाव, ढाकेफळ, तारू पिंपळवाडी, औरंगपूर, बुटेवाडी परिसरातील आहेत. या प्रकरणी बिडकीन पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक पंकज उदावंत हे पुढील तपास करत आहेत. दरम्यान बिडकीन येथे 12 राष्ट्रीयीकृत बँका असून इतर बँकेत देखील अशाप्रकारे काही प्रकरणे निघण्याची शक्यता असल्याची गावकऱ्यांत चर्चा आहे. विशेष म्हणजे या राष्ट्रीयीकृत बँकेचे कार्यक्षेत्रात न येणाऱ्या गावाला देखील अनेक योजनांत मोठ्या प्रमाणात कर्जवाटप केले आहे.