प्राध्यापकाची विद्यार्थिनीकडे सेक्सची मागणी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बीएससीचे शिक्षण घेणाऱ्या एका १९ वर्षाच्या कॉलेज विद्यार्थीनीला वेगवेगळी आमिष दाखवून तिच्याकडे सेक्सची मागणी करणाऱ्या कॉलेजच्या प्राध्यापकाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. प्रध्यापकाविरुद्ध तरुणीने गावदेवी पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. तिच्या तक्रारीवरुन पोलिसांनी दिलीपकुमार लालमणी हरिजन या प्राध्यपकाला बेड्या ठोकल्या आहेत.

त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.दिलीपकुमार हा गावदेवी येथील एका नामांकित कॉलेजमध्ये रसायनशास्त्र या विषयाचा प्राध्यापक आहे. तक्रारदार तरुणी याच कॉलेजमध्ये बीएससीच्या चौथ्या सेमिस्टरचे शिक्षण घेत आहे. जानेवारी 2018 पासून ती नियमित कॉलेजमध्ये हजर राहात होती.

मात्र कॉलेज अ‍ॅडमिशनमुळे तिला रसायनशास्त्र विषयाच्या लेक्‍चर आणि प्रॅक्टीकलसाठी बसू दिले नव्हते. त्यासाठी तिचे प्रयत्नही सुरु होते. मात्र तिच्या प्रयत्नांना यश आले नव्हते. सोमवारी 18 फेब्रुवारीला ती महाविद्यालयामध्ये आली. झुलॉजी प्रॅक्टीकल आणि एनएसएस कार्यक्रम संपल्यानंतर ती साडेअकरा वाजता तिच्या मैत्रिणीसोबत रसायनशास्त्र विषयाच्या लेक्‍चरसाठी गेली होती. साडेबारा वाजता क्‍लास संपल्यानंतर सर्व विद्यार्थी बाहेर निघून गेले. यावेळी तिने तिचे प्रॅक्टीकल अर्धवट झाले असून रिपीटेशन कधी आहे याबाबत विचारणा केली. त्यानंतर त्याने तिच्याकडे शरीरसुखाची मागणी केली. पुढील तपास गावदेवी पोलीस करीत आहेत.