धक्कादायक ! पुण्यात ‘गुप्तधन’, ‘पुत्रप्राप्ती’च्या आमिषानं भोंदूबाबानं केलं 5 तरूणींचं ‘लैंगिक’ शोषण

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – तुमच्या घरामध्ये करणी केली असून घरातील गुप्तधन मिळविण्यासाठी व मुलगा होण्यासाठी नग्न पुजा करावी लागेल, असे सांगून एका भोंदुबाबाने एकाच कुटुंबातील पाच तरुणींचे लैंगिक शोषण केले आहे. त्यातील एका तरुणीबरोबर त्याने दुसरे लग्न केले आहे. याप्रकरणी पिंपरी पोलिसांनी सोमनाथ कैलास चव्हाण (वय ३२, रा. खैरेवाडी, ता. रोहा, जि़. रायगड) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून त्याला अटक केली आहे. हा प्रकार पिंपरीतील नेहरुनगरमध्ये २२ जानेवारीपासून सुरु होता.

याबाबत पोलिसांनी सांगितले की, सोमनाथ चव्हाण याने या कुटुंबास सांगितले की, तुमच्या घरामध्ये पुत्र प्राप्ती होऊ नये, म्हणून घरातील प्रत्येक सदस्यावर त्यांच्या नात्यातील बाईने करणी केली आहे. तुमच्या घरातील एका रुममध्ये गुप्त धन आहे. त्यामध्ये सात पेट्या धन, एक सोन्याची घागर, एक गणपतीची मुर्ती असा खजिना आहे. तुमच्या घरातील एका मुलीचा जीव धोक्यात आहे. तुम्हाला पुत्र प्राप्ती होण्यासाठी व गुप्तधन मिळविण्यासाठी आणि या मुलीचा जीव वाचविण्यासाठी त्याने तुमच्या घरात तीन उतारे व नग्न पुजा करावी लागेल, असे सांगितले.

त्यासाठी ३ लाख रुपये खर्च येईल व मला ११ हजार रुपये दक्षिणा द्यावी लागेल. तसे सांगितले. शिवाय ते तीन उतारे तुम्ही १५ दिवसामध्ये सुरु केले नाही तर तुमच्या कुटुंबातील सर्व व्यक्तींच्या जीवीतास खूप मोठा धोका आहे, अशी भीती या कुटुंबाला दाखविली. जीवाच्या भितीने या कुटुंबाने या पुजेला संमती दर्शविली. त्यानंतर त्याने एक दिवस रात्रीच्या वेळी या फिर्यादीच्या पाच बहिणींना उतारा करण्याच्या बहाण्याने रुममध्ये घेऊन दार बंद केले. त्यांना त्यांच्या अंगावरील सर्व कपडे काढून पांढऱ्या कपड्यावर झोपायला लावले. त्यानंतर त्याने लिंबु चिरुन त्याचा रस त्यांच्या अंगावर चोळला.

अवघड जागी तो टाकला. त्यानंतर अश्लिल कृत्य केले. त्यांच्यातील एका बहिणीवर त्याने बलात्कार केला. त्यानंतर बाहेर जाताना त्यांना बाहेर कोणाला काही सांगितले तर मी तुमच्या आई वडिलांना माझ्या दैवी शक्तीने व काळ्या जादूने मारुन टाकीन अशी भितीदायक धमकी दिली. त्यामुळे त्यांनी ही बाब तेव्हा कोणाला सांगितली नाही. २१ फेबु्रवारी रोजी त्याने तिसऱ्या वेळी उतारा काढतेवेळी त्यांच्यातील एका बहिणीवर तीनदा बलात्कार केला. तसेच त्याचे पूर्वी लग्न झाले असतानाही फिर्यादीच्या बहिणीबरोबर लग्न केले. हा सर्व प्रकार असह्य झाल्याने शेवटी या तरुणीने पोलिसांकडे धाव घेतली. पिंपरी पोलिसांनी अंधश्रद्धा निर्मुलन व जादुदोणा प्रतिबंध कायदा तसेच पोक्सो कायद्याखाली गुन्हा दाखल केला आहे.