कोरेगाव पार्कमधील ‘इलुमी’ आणि ‘सुकन्या’ स्पा मधील हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

थायलंडच्या ५ तरुणींची सुटका

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाने कोरेगाव पार्क मध्ये असलेल्या सुकन्या आणि इलूमी स्पावर छापा घालून तेथे सुरु असलेल्या हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. तेथून ५ थायलंडच्या तरुणींची सुटका करण्यात आली आहे. तर एका स्पाच्या व्यवस्थापकांना अटक करण्यात आली आहे.

सुकन्या स्पावर घातलेल्या छाप्यात पोलिसांनी तेथून ३ तरुणींची सुटका केली तर सागर कैलास परदेशी (३६, कोंढवा बु.), केवीन सॅमसंग सनी (३०, भवानी पेठ) या दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. तर इलूमी स्पा वर घातलेल्या छाप्यात २ तरुणींची सुटका करून मालक रितेश जोगीन व व्यवस्थापक महेश नामदेश शिंदे (३१, भीमनगर) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुन्हे शाखेचे सहायक पोलीस आयुक्त भानुप्रताप बर्गे यांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती. त्यानुसार कोरेगाव पार्क येथील पावर प्लाझा इमारतीमध्ये असलेल्या सुकन्या स्पा वर पथकाने गुरुवारी छापा घातला. त्यावेळी तेथे स्पा मालक राहूल राठोड हा परदेशातील तरुणींना पुण्यात आणून सेक्स रॅकेट चालवित आहे. तो सध्या थायलंडमध्ये वास्तव्यास आहे. असे समोर आले. त्यानंतर तेथील दोघा व्यवस्थापकांना पोलिसांनी ताब्यात घेतले. तर ३ थायलंडच्या तरुणींची सुटका केली.

तसेच पावर पॉईन्ट इमारतीमध्ये असलेल्या इलूमी स्पावरदेखील पोलिसांनी गुरुवारी छापा घातला. त्यावेळी स्पा मॅनेजर महेश शिंदे व मालक रितेश जोगीन हे दोघे स्पा च्या नावाखाली सेक्स रॅकेट चालवत असल्याचे समोर आले. याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून थायलंडच्या २ तरुणींची सुटका करण्यात आली.

आत काय चालते रिसेप्शनिस्ट तरुणींना माहितीच नाही
इलूमी स्पावर छापा घातला. त्यावेळी नागालॅंड व मेघालय येथील दोन विद्यार्थीनींना ग्राहकांना आकर्षीत करण्यासाठी रिसेप्शनिस्ट म्हणून ठेवण्यात आले होते. त्यांच्याकडे चौकशी केल्यावर त्यांना आत काय चालते याची माहितीच नव्हती असे त्या दोघींनी सांगितले. त्यामुळे परराज्यातील विद्यार्थीनींनी अशा प्रकारच्या प्रलोभनांना बळी न पडण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

थायलंडच्या तरुणी टुरिस्ट व्हिसावर
सुकन्या स्पा मधून सुटका करण्यात आलेल्या तरुणी या थायलंडमधून टुरिस्ट व्हिसावर आलेल्या असल्याचे तपासात समोर आले आहे. त्यांना पैशांचे अमिष दाखवून त्यांच्याकडून हा व्यवसाय करून घेत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

ही कारवाई पोलीस उपायुक्त शिरीष सरदेशपांडे, सहायक पोलीस आयुक्त भानुप्रताप बर्गे, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मनिषा झेंडे, सहायक पोलीस निरीक्षक अश्वीनी जगताप, पोलीस उपनिरीक्षक योगिता कुदळे, कर्मचारी नामदेव शेलार, राजाराम घोगरे, प्रमोद म्हेत्रे, राजेंद्र कचरे, नितीन तेलंगे, सुनील नाईक, तुषार अल्हाट, सचिन कदम, राजेंद्र ननावरे, निलेश पालवे, किरण अब्दागिरे, प्रमोद माळी, जितेंद्र तुपे, विशाल शिर्के, सुधीर इंगळे, राहूल सकट, शंकर संपते, अनुराधा धुमाळ, ननिता येळे, सुप्रिया शेवाळे यांच्या पथकाने केली.