80 कोटीच्या नोटांचा पाऊस पाडण्याच्या भूलथापा देऊन 21 वर्षीय तरूणीवर लैंगिक अत्याचार; भामट्या मांत्रिकाला अटक

वर्धा : पोलीसनामा ऑनलाइन – 21 वर्षीय तरुणीला पैशाचे अमिष दाखवून 80 कोटीच्या नोटांचा पाऊस पडतो, अशा भूलथापा देऊन लैंगिक अत्याचार करणाऱ्या भामट्या मांत्रिकाला पोलिसांनी भंडारा येथून अटक केली आहे. हिंगणघाटमधील येरणगाव येथे काही दिवसापूर्वीच हा प्रकार समोर आला होता. यापूर्वी या प्रकरणात 7 जणांना अटक केली होती. आता या भामट्यांचा म्होरक्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. दिनेश उर्फ सर्वोत्तम झाडे असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पिडित तरुणीच्या डोक्यावरील पितृछत्र हिरावले आहे. आई आणि नातलग तिचा सांभाळ करतात. पीडितेने आठवी ते दहावीपर्यंतचे शिक्षण वर्ध्यात केले. दरम्यान पीडितेच्या आई आणि काकाच्या संपर्कात बालू मंगरूळकर ही व्यक्ती आली. त्याने मांत्रिक देखील जोडला. आपल्यावरील कर्ज फेडता येईल, आपण मालामाल होवू असे अमिष त्याने पिडितेची आई आणि काकांना दाखवले.

त्यांनीही त्या अमिषाला बळी पडले. पीडितेला भूलथापा देत येरणगाव, नांदगाव शिवारात निर्जनस्थळी नेऊन विवस्त्र करून शरिराला लिंबू लावण्याचा प्रकार केला. पीडितेने याला विरोध करून तेथून पळ काढला. मात्र, तिच्या आईने तिला धमकावून पुन्हा पीडितेला जबरदस्तीने असे प्रयोग वारंवार करायला भाग पाडले. या त्रासाला कंटाळून पीडिता बेपत्ता झाली होती. तिने पोलिसांत तक्रार दिल्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला.