मुख्याध्यापकाचा विद्यार्थिनींशी अश्‍लील संवाद ; पोलिसांत फिर्याद दाखल

सोयगाव : पोलीसनामा ऑनलाईन – सोयगाव तालुक्यातील जरंडी येथील जिल्हा परिषदेच्या केंद्रीय प्राथमिक शाळेतील तीन वर्गांतील तब्बल २१ विद्यार्थिनींनी शाळेचा मुख्याध्यापक अश्‍लील भाषा वापरत असल्याची तक्रार पालकांकडे केली. या प्रकरणी विद्यार्थिनींच्या सांगण्यावरून पालकांच्या वतीने तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष विष्णू वाघ यांनी सोयगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

जरंडी येथील शाळेत पहिली ते आठवीपर्यंत वर्ग आहेत. जिल्हा परिषदेच्या केंद्रीय प्राथमिक शाळेतील सहावी ते आठवी या तीन वर्गांतील विद्यार्थिनींना शाळेच्या मुख्याध्यापकानेच अश्‍लील भाषेतील संकेतांक वापरून त्यांना आठवडाभरापासून मानसिक त्रास दिला. या घटनेची तक्रार विद्यार्थिनींनी पालकांकडे केली. त्यावरून पालकांनी मंगळवारी सकाळी शाळा गाठली. सदर घटनेची पालकांच्या वतीने विष्णू वाघ, गोविंद राठोड यांनी सोयगाव पोलिसांत फिर्याद दिली. रात्री उशिरापर्यंत गुन्ह्याची नोंद करण्यात आली नव्हती. गटविकास अधिकारी एम. सी. राठोड, गटशिक्षणाधिकारी विजय दुतोंडे यांनी तात्काळ शाळेला भेट देऊन २१ विद्यार्थिनींचा जबाब घेतला. यामध्ये शाळेच्या शिक्षकांसह विद्यार्थिनींची चौकशी करण्यात आली असून, संयुक्त अहवाल कारवाईसाठी पाठविण्यात आला आहे.

सदर घटनेविषयी गटविकास अधिकारी एम. सी. राठोड म्हणाले की, ‘संबंधित शाळेला भेट देऊन या प्रकरणाची चौकशी करण्यात आली असून यामध्ये तीनही वर्गांतील विद्यार्थिनींचे जबाब नोंदविण्यात आले. संबंधित मुख्याध्यापकास तातडीने निलंबित करण्याचा अहवाल जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पाठविण्यात आला आहे.’

पोलिस निरीक्षक शेख शकील यांनी दिलेल्या माहितीनुसार, जरंडी शाळेची तक्रार प्राप्त झाली आहे. यावर चौकशी करण्यासाठी महिला पोलिस नियुक्त करण्यात आले असून, चौकशीत तथ्य आढळल्यास गुन्हा दाखल करण्यात येईल.

Loading...
You might also like