शबाना आझमी आणि जावेद अख्तर, पाकिस्तानात जाणार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – हिंदी सिनेसृष्टीतले दिग्ग्ज लेखक, गीतकार जावेद अख्तर आणि त्यांची पत्नी अभिनेत्री शबाना आजमी यांना पाकिस्तानमधील कराची येथील आर्ट्स काऊन्सिलने एका कार्यक्रमासाठी निमंत्रण दिलं आहे. या कार्यक्रमात या सहभागी होण्यासाठी जावेद अख्तर आणि शबाना आजमी हे पाकिस्तानात जाणार असल्याचे कळते आहे. या कार्यक्रमात शबाना आझमी यांचे वडील प्रसिद्ध कवी गीतकार कैफी आझमी यांना श्रद्धांजली वाहिली जाणार आहे.

‘आम्ही कैफी आझमी यांची मुलगी शबाना आझमी आणि त्यांचे पती जावेद अख्तर यांना कार्यक्रमासाठी निमंत्रित केलं आहे. त्यांच्यासहित या कार्यक्रमासाठी भारतातील काही महत्त्वाच्या व्यक्तींनाही निमंत्रित केले आहे. असे आर्ट्स काऊन्सिलच्या एका पदाधिकाऱ्याने सांगितले. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या कार्यक्रमात शबाना आझमी आणि जावेद अख्तर यांनी पाकिस्तानात येण्याची तयारी दर्शवली आहे. यावेळी शबाना आझमी आणि जावेद अख्तर उपस्थितांना संबोधितही करणार आहेत.

‘ही खूप मोठी संधी आहे. भारतातील प्रसिद्ध लेखक, कवी आणि कलाकार येऊन पाकिस्तानमधील लोकांशी संवाद साधणार असून हा कार्यक्रम यशस्वी होणार याची आम्हाला खात्री आहे’, असं काऊन्सिलचे सचिव प्रोफेसर एजाज फारुखी यांनी सांगितलं आहे. हा कार्यक्रम २३ आणि २४  फेब्रुवारीला पार पडणार आहे.