शाहीन बाग गोळीबार : युवकानं सांगितलं ‘फायरिंग’चं कारण, पोलिस देखील झाले ‘हैराण’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दिल्लीमधील शाहीन बाग येथे सीएएच्या निषेधार्थ एका युवकाने गोळीबार केला आणि यावेळी हा युवक ‘जय श्रीराम’ अशा घोषणा देखील देत होता अशी माहिती समोर आली आहे. तसेच चौकशीदरम्यान आरोपीने पोलिसांना सांगितले की ‘या देशात एकमेव हिंदूच चांगले काम करतील.’ आरोपीने पोलिसांना आपले नाव कपिल गुर्जर असे सांगितले असून तो पूर्व दिल्लीतील दल्लूपुरा येथील रहिवासी आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी हा २५ वर्षांचा असून तो एका खासगी महाविद्यालयातून शिक्षण घेत आहे. या युवकाला या गोष्टीचा राग होता की काही लोकांनी मिळून आपल्याच देशातील शाहीन बागेत आंदोलने करून बाग हस्तगत केली आहे. त्यामुळे आरोपी युवकाने तिथे रागाच्या भरात गोळीबार केला. त्याने शाहीन बागेत २ गोळ्या झाडल्या आहेत.

तर दुसरीकडे ही घटना प्रत्यक्ष पाहिलेल्या एका गृहस्थाने सांगितले की, पोलिसांजवळ उभ्या असणाऱ्या युवकाने दोन किंवा तीन वेळेस गोळीबार केला. आम्हाला अचानकच बंदुकीच्या गोळ्यांचा आवाज आला जेव्हा आमचे लक्ष तिकडे गेले तेव्हा गोळ्या झाडणारा युवक ‘जय श्री राम’ च्या घोषणा देत होता. तसेच त्याच्याकडे सेमी ऑटोमेटिक बंदूक होती आणि त्याने दोन फेऱ्या झाडल्या. त्याची बंदूक जाम झाल्याने त्याने तेथून पळ काढला आणि तशातच त्याने पुन्हा गोळीबार करण्याचा प्रयत्न देखील केला आणि बंदूक झाडीत टाकली. यानंतर त्याला काही पोलिसांच्या मदतीने पकडण्यात आले, असे त्यांनी सांगितले.

दरम्यानच्या काळात जामिया विद्यापीठाच्या परिसरात सुधारित नागरिकत्व कायद्याच्या विरोधात निदर्शनं चालू असताना एका युवकाने गोळीबार केला होता. तसाच काहीसा प्रकार शाहीन बागमध्ये घडला असून आता दिल्लीमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. विशेष म्हणजे हिंदू महासभेने जामिया विद्यापीठात गोळीबार करणाऱ्या माथेफिरू तरुणाचा सत्कार करण्याची घोषणा केली होती.