शाहीन बाग ‘इम्पॅक्ट’ ? दिल्लीतील जनतेनं भाजप आणि अमित शाहांना दिला ‘झटका’, ‘आप’ चा भाजपवर ‘निशाणा’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दिल्लीत आपचा झाडू चालला आणि भाजपचा धुराळा उडाळा आहे. दिल्लीत भाजपने शाहीन बाग मुद्दा चांगला उचलून धरला होता. त्यामुळे निकालाच्या दिवशी शाहिन बाग परिसर येथे असलेला ओखला मतदार संघावर सर्वांच्या नजरा आहेत. या मतदार संघात भाजपला मोठा धक्का बसताना दिसत आहे. निकाल लागेल तसं तसं शाहीन बागमधील आंदोलनकारी उठून निघून जातील असा दावा भाजपकडून करण्यात आला होता. भाजपला मोठा विश्वास होता की, भाजपला दिल्लीत मोठे यश मिळेल मात्र तसे होताना दिसले नाही.

यावर बोलताना आपचे ओखला मतदार संघातील उमेदवार अमनतुल्लाह खान निकालादरम्यान भाजपवर टीका करताना म्हणाले की दिल्लीतील जनतेने भाजप आणि अमित शाह यांना करंट लावण्याचे काम केले आहे. हा कामाचा विजय आहे आणि द्वेषाची हार. मी नाही लोकांनी हा रेकॉर्ड तोडला आहे.

सीएए विरोधात आंदोलन सुरु असलेला शाहीन बाग परिसर ओखला मतदार संघात येतो. त्यामुळे या निवडणूकीत शाहीन बाग परिणाम काय असणार हे सर्वांना पाहायचे होते. भाजपने तर शाहीन बाग हारणार असा दावा केला होता. परंतु येथे भाजपचे उमेदवार असलेले बरहम सिंह दुपारी 1.15 च्या दरम्यान 7312 मतांवर होते. तर आपचे उमेदवार अमनतुल्लाह खान यांनी मोठी आघाडी घेतली होती. ते 35,813 मतं घेऊन आघाडीवर आहेत. त्यामुळे आप उमेदवार या मतदार संघातून विक्रमी मतांनी विजय होणार हे जवळपास निश्चित झाले आहे. भाजप उमेदवार पराभव देखील भाजपसाठी मोठा धक्का आहे.

दिल्लीत आप हॅट्रिक करणार आहे. दिल्लीत पुन्हा केजरीवाल सरकार स्थापन होईल. सध्या दिल्लीत आप 55-57 जागांवर विजयी होताना दिसत आहे तर भाजपच्या हाती 12-13 जागा लागू शकतात. तर काँग्रेसला अद्याप एकाही जागेवर विजय मिळवता आलेला नाही.